मुंबई महापालिकेचे २५०० विद्यार्थी ऑलिम्पियाडसाठी सज्ज

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात कोठेही कमी पडू नयेत यासाठी मुंबई महापालिकेने २०१७-१८ पासून विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यास सुरुवात केली.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची आवड निर्माण व्हावी. त्यांनी यूपीएससी, एमपीएससीप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावे या उद्देशाने मुंबई महापालिकेकडून दरवर्षी ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये विद्यार्थी पाठवले जातात. कोरोनामुळे गतवर्षी विद्यार्थी ऑलिम्पियाड परीक्षा देऊ शकले नाही. मात्र यंदा अडीच हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झाले आहेत. या स्पर्धेची शहर स्तरावरील फेरी २६ फेब्रुवारीला होणार असून, त्यामध्ये निवड होणारे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात कोठेही कमी पडू नयेत यासाठी मुंबई महापालिकेने २०१७-१८ पासून विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने केंब्रिज विद्यापीठाशी संलग्न असलेल्या फायर फिश प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी करार केला. त्यानुसार २०१७-१८ पासून दरवर्षी मुंबई महापालिकेमधील विद्यार्थ्यांसाठी केंब्रिज विद्यापीठाकडून ऑलिम्पियाड परीक्षेचे आयोजन केले जाते. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर होत असल्याने या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांचा कस लागतो. ऑलिम्पियाड परीक्षेसाठी तिसरी ते आठवीचे विद्यार्थी बसतात. ही परीक्षा इंग्रजी, गणित व विज्ञान या तीन विषयांची घेतली जाते. या परीक्षेत राष्ट्रीय स्तरावर यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रजत व कांस्य पदकाने गौरवण्यात येते. तसेच उल्लेखनीय यश मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाते. गतवर्षी कोरोनामुळे या परीक्षेमध्ये मुंबई महापालिकेचे विद्यार्थी सहभागी होऊ शकले नसले तरी यावर्षी २५४७ विद्यार्थी शहर स्तरावरील परीक्षेत सहभागी होणार आहे. शहर स्तरावरील परीक्षा २६ फेब्रुवारीला होणार असून, त्यातून निवड होणारे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत सहभागी होतील. गणिताची भीती विद्यार्थ्यांच्या मनात असल्याचे म्हटले जाते, परंतु मुंबई महापालिकेतील विद्यार्थ्यांनी गणित विषयामध्येच सर्वाधिक नोंदणी केली आहे. गणित विषयांच्या परीक्षेसाठी सर्वाधिक १०७० विद्यार्थी सहभागी होणार असून, त्याखालोखाल इंग्रजी ७५७ आणि विज्ञान ७२० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उज्ज्वल यश मिळावावे यासाठी मुंबई महापालिकेकडून सध्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.

कशी होते विद्यार्थ्यांची निवड

ऑलिम्पियाड परीक्षेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची प्रथम नोंदणी करून त्यांची प्रवेश परीक्षा घेण्यात येते. यावेळी प्रवेश परीक्षेसाठी १९ हजार ६५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सर्व साहित्य महापालिकेकडून पुरवण्यात येते. इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेत ८८ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणे अपेक्षित आहे. इयत्ता ६ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक तर इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवणे अपेक्षित असते. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांनी निवड शहर स्तरावरील परीक्षेसाठी होते. यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी निवड राष्ट्रीय स्तरावरील अंतिम परीक्षेसाठी होते. महापालिकेचे उपशिक्षणाधिकारी इंदरसिंग कडाकोट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही शाळांकडून विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यात येते. या परीक्षेला महापालिकेच्या एसएससी, सीबीएसई, आयसीएसई या तिन्ही बोर्डाचे विद्यार्थी सहभागी होतात, अशी माहिती मुंबई महापालिकेचे प्रभारी शिक्षणाधिकारी राजू तडवी यांनी दिली.