घरमुंबईमाहिम किल्ल्यावरील २६७ झोपड्या हटवल्या

माहिम किल्ल्यावरील २६७ झोपड्या हटवल्या

Subscribe

मुंबई : मुंबईसह राज्यातील रायगड, विशाळगड, प्रतापगड आदी १४-१५ किल्ल्यांवर अतिक्रमण झाल्याप्रकरणी काही संघटनांनी मोर्चा काढून आवाज उठवला होता. त्याचे तीव्र पडसाद विधिमंडळ अधिवेशनातही उमटले. शिवकालीन गड, किल्ल्यांवर अनेक प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे हटविण्याचे व गड, किल्ल्यांचे जतन, संवर्धन करण्याचे आदेश सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित प्राधिकणांना दिले आहेत. तसेच, मुंबईतील किल्ल्यांचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने, मुंबई महापालिकेने, समुद्रालगत असलेल्या माहिम येथील ८०० वर्षे जुन्या व भग्नावस्थेतील माहिम किल्ल्यावरील २६७ घरे, झोपड्या कारवाई करून हटविल्या आहेत. त्यापैकी २६३ पात्र झोपडीधारकांना पर्यायी घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यामुळे आता माहिम किल्ल्याच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई हद्दीत माहिम, सायन, धारावी आदी किल्ले आहेत. हे किल्ले अनेक वर्षांपासून अस्तित्वात असल्याने ते जीर्ण व भग्नावस्थेत आहेत. राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे व फडणवीस सरकारने किल्ल्यांचे संवर्धन व जतन करण्यासाठी आणि सुशोभीकरण आदी कामे करण्यासाठी अर्थसंकल्पात १,७२९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

- Advertisement -

किल्ल्यावरील २६७ झोपड्या हटविल्या
मुंबईतील किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी मुंबई महापालिकेने चांगलीच कंबर कसली आहे. महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने, जी/उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली पालिका अतिक्रमण निर्मूलन पथकाने जीर्ण व धोकादायक स्थितीतील माहिम किल्ल्याचे व त्यावरील झोपड्यांचे अगोदर सर्व्हेक्षण केले आहे. त्यानुसार सदर किल्ल्यावर २६७ झोपड्या उभारण्यात आल्याचे व किमान ३ हजार लोक राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार, पालिकेने किल्ल्याचे भग्नावशेष कोसळून कोणतीही दुर्घटना घडू नये व त्यामध्ये कोणी जखमी अथवा मृत होऊ नये या दृष्टीने सदर झोपडीधारकांना झोपड्या खाली करण्याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच, पालिकेने २६७ पैकी २६३ झोपड्यांना उपलब्ध कागदपत्रे, पुरावे यांच्या आधारे अधिकृत ठरवले, तर ४ झोपड्या अनधिकृत ठरवत त्यांना अपात्र ठरवले आहे.

२६३ झोपडीधारकांना पर्यायी घरे
मुंबई महापालिकेने, एसआरए प्राधिकरणामार्फत माहिम किल्ल्यावरील पात्र झोपडीधारकांना मालाड, साईराज गुराईपाडा येथील १७५ पर्यायी घरे, एमएमआरडीए प्राधिकरणाकडून भंडारी मेटलर्जी येथील पुनर्वसन प्रकल्पाकरिता बांधण्यात आलेल्या इमारतीमध्ये ७७ घरे, तर मालवणी येथील रॉयल फिंच इमारतीमधील ११ पर्यायी घरे देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच, पर्यायी घरे देऊनही सदर झोपड्यांवरील ताबा न सोडणाऱ्या झोपडीधारकांना पोलीस बळाचा व पालिका यंत्रणेचा वापर करून हटवले. तसेच, काही झोपडीधारकांच्या विरोधात पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आल्याची माहितीही साहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी दिली.

- Advertisement -

किल्ल्याचा इतिहास
समुद्रालगत वसलेला माहिमच्या किल्ल्यावर अपरंता (उत्तर कोकण) येथील राजा बिंबदेव याने येथे आपले राज्य वसवले होते. या राज्याला ‘महिकावती’ असे देखील म्हणतात. बिंबदेव राजाणे बसावलेले राज्य भरभराटीला आले आणि त्याच्या वंशजांनी माहीममध्ये माहीम किल्ला ११४० आणि १२४१ ला बांधला. आजच्या घडीला सदर किल्ला ८०० वर्षाहून जुना आहे.
इंग्रजांनी माहीमचा किल्ला एकेकाळी बंदर म्हणून वापरला असून तेथे सीमाशुल्क गृह उभारले होते. स्वातंत्र्यानंतर माहीम किल्ल्याचा परिसर सीमाशुल्क कार्यालयांनी रिकामा केला, मात्र सदर किल्ल्याची मालकी आजही त्यांची आहे.
१९७२ मध्ये, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम, १९६० अन्वये जेव्हा माहीमचा किल्ला महाराष्ट्र अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला, तेव्हा सीमाशुल्क विभागाने गडावरील विद्यमान सुरक्षा काढून टाकली. ज्यामुळे किल्ल्यावर संपूर्णपणे अतिक्रमण झाले होते. राज्य सरकारने माहिम किल्ल्याला सर्व प्रथम विशेष प्रकल्प म्हणून घोषित केले. या किल्ल्याच्या देखभाल व दुरूस्तीसाठी किल्ल्यावरील २६७ अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -