Drug Case: १६ कोटींच्या मेथॅक्युलॉन ड्रग्जसह तिघांना अटक

तिघांना गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोळा कोटी रुपयांच्या मेथॅक्युलॉन या ड्रग्जसहीत तिघांना गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. इम्रान इक्बाल जालोरी, अमजद हमीद खान आणि आसिफ अली मोहम्मद अरब अशी या तिघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी १६ किलो १०० ग्रॅम वजनाच्या मेथॅक्युलॉनचा साठा जप्त केला आहे. तिन्ही आरोपी मूळचे ॲण्टॉप हिलचे रहिवाशी असल्याचे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी सांगितले.

मुंबई आणि उपनगरात काहीजण मेथॅक्युलॉन या ड्रग्जची विक्री करीत असून या ड्रग्जची विक्रीसाठी संबंधित आरोपी ॲण्टॉप हिल परिसरात येणार असल्याची माहिती युनिट एकच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस उपायुक्त निलोत्पल यांच्या पथकातील पंढरीनाथ पाटील, शिंदे, प्रशांत गावडे, तावडे, मोरे, शिंदे, खेडकर, सकट, निंबाळकर, गोडे, जाधव, माने, वर्‍हाडी, रणदिवे यांनी एसएमडी रोड, कल्पक इस्टेटजवळील स्टेट बँकेच्या एटीएम सेंटरजवळ साध्या वेशात पाळत ठेवली होती.

बुधवारी रात्री सव्वानऊ वाजता तिथे तीन तरुण आले. या तिघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना या पोलीस पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील प्लास्टिक बॅगेतून पोलिसांनी सोळा किलो शंभर ग्रॅम वजनाचे मेथॅक्युलॉन नावाचे ड्रग्जचा साठा जप्त केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याच ड्रग्जची किंमत सोळा कोटी दहा लाख रुपये आहे. या तिघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत नंतर तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांना गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तिन्ही आरोपी ॲण्टॉप हिल परिसरात राहत असून ते मेथॅक्युलॉनची मुंबईसह उपनगरात विक्री करीत असल्याचे तपासात उघडकीस आले. त्यांनी ते ड्रग्ज कोठून आणले, त्यांनी यापूर्वीही या ड्रग्जची विक्री केली आहे का, त्यांचे इतर कोणी सहकारी आहेत का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.


हेही वाचा – वर्ध्यात गोबर गॅसच्या टाकीत आढळल्या अर्भकांच्या 11 कवट्या अन् 54 हाडं ; पोलीस अधीक्षकांची माहिती