घरताज्या घडामोडीवय अवघे ३० वर्षे वाचवले ३,१०० प्राण, ऑक्सीजन पुरवणारा देवदूत

वय अवघे ३० वर्षे वाचवले ३,१०० प्राण, ऑक्सीजन पुरवणारा देवदूत

Subscribe

जनतेकडून आणि सीएसआर फंडच्या माध्यमातून एकुण ३० लाख रुपये मदत जमा

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांना ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या संकटात मदत करण्यासाठी एक तरुण सकाळी ४ वाजेपर्यंत जागून रुग्णांना आणि गरजूंना ऑक्सीजनचा पुरवठा करत आहे. ठाण्यातील कोळशेत येथील रहिवासी चीनू क्वात्रा हा ३० वर्षीय युवक कोरोना संकटात असलेल्या रुग्णांचे जीव वाचवण्याचे काम करत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत चिनू क्वत्राने अवघ्या ७५ दिवसामध्ये तब्बल ७ लाख गरजूंना अन्नधान्य आणि अन्न पाकिटे पुरवले होते तर कोरोनाची दुसरी लाट भयानक असल्यामुळे नागरिकांना अन्नधान्यापेक्षा ऑक्सीजनची फार मोठी गरज आहे. यामुळे त्याने ऑक्सीजन पुरवण्याचा निर्णय घेतला.

२४ तास हेल्पलाईन सेवा कार्यरत

चीनू क्वात्रा यांनी सांगितले कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान ३ हेल्पलाईन सेवा सुरु केल्या होत्या या सेवा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय यामुळे घेतला गेला कारण कोरोना रुग्ण जर मध्य रात्री मदतीसाठी फोन करेल तर त्याला तात्काळ मदत करण्यात येईल. निर्णयाच्या तिसऱ्या दिवसापासूनच कोरोना रुग्णांचे आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे ५ ते ६ हजार फोन फक्त ऑक्सीजनसाठी आले होते. या फोननंतर मुंबई आणि ठाण्यासह उपनगरांतील सर्व स्तरावरील नागरिकांना आणि रुग्णांना मदत करणाऱ्यांचे नंबर जमा केले आणि या सर्वांना एकत्र घेऊन एक साखळी तयार करण्यात आली. यामुळे मुंबई उपनगरातील कोणत्याही व्यक्तीचा फोन आल्यास त्याला मदत करणे शक्य झाले असल्याचे चिनू क्वात्रा यांनी सांगितले.

- Advertisement -

३ हजार १०० लोकांना ऑक्सीजनची मदत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासली आहे. यामुळे रुग्णांना ऑक्सीजन सेवा सुरु केली. १३ एप्रिलपासून आतापर्यंत एकुण ३ हजार १०० रुग्णांना ऑक्सीजन पुरवण्यात आला आहे. सर्वाधिक रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑक्सीजनचा पुरवठा केला आहे. तसेच ज्या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांना जाता आले नाही तिथे त्यांच्या मदत साखळीतील सहकार्यांनी ऑक्सीजन मदत पोहचवली आहे.

चीनू क्वात्राने सांगितले की, या कोरोनाच्या संकटामध्ये मदतकार्य करणे त्यांच्या एकट्याला शक्य नव्हते यामुळे त्यांनी एकुण १२ सहकाऱ्यांची टीम बनवली आहे. यामध्ये ८ सहकारी वॉर रुम संबंधित मदत कार्य करत आहेत. तर ४ सहकारी ऑक्सीजन रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत.

- Advertisement -

मदत कार्य करण्यासाठी २ एनजीओने केली मदत

सुरुवातीला कोरोना रुग्णांना ऑक्सीजन सेवा पुरवण्यासाठी त्यांना काही संसधानांची आवश्यकता होती. यावेळी त्यांना अनंता आणि खुशियां नावाच्या दोन एनजीओने मदत केली. या NGO कडून चीनू यांना सुरुवातीला १० ऑक्सीजन सिलेंडर आणि ५ ऑक्सीजन कंसंट्रेटरची मदत मिळाली होती.

जनतेकडून ३० लाखांची मदत

चीनू यांना या महामारीमध्ये लोकांना मदत करण्यासाठी आर्थिक सहाय्यही महत्त्वाचे होते यामुळे त्यांनी जनतेकडून आणि सीएसआर फंडच्या माध्यमातून एकुण ३० लाख रुपये मदत जमा केली. यामुळे ज्या नागरिकांना, रुग्णांना ऑक्सीजनची गरज होती त्या रुग्णांना ऑक्सीजन पुरवण्यासाठी अधिक बळ मिळाले होते. त्यांच्याकडे आता वेग-वेगळ्या क्षमतेचे एकुण ५० ऑक्सीजन सिलेंडर आहेत. यामध्ये आताच्या घडीला एकुण ४० सिलेंडर कोरोना रुग्णांना देण्यात आले आहेत. तसेच उर्वरित सिलेंडर रात्री मदत मागितल्यास पुरवण्यासाठी ठेवले आहेत. या व्यतीरिक्त ४ ऑक्सीजन कंसंट्रेटर मशीनही उपलब्ध आहेत.

ऑक्सीजन सेवा ३ तत्वांवर अधारित

चीनू क्वात्रा यांनी सुरु केलेली ऑक्सीजन सेवा ३ मुख्य तत्वांवर अधारी आहे. यामध्ये प्रथम जे सुपर क्रिटिकल कोरोना रुग्ण आहेत. त्यांना प्रथम मदत पोहोचवली जाते या रुग्णांना सर्वाधिक ऑक्सीजनची आवश्यकता आहे. या रुग्णांचे ऑक्सीजन लेवल ५२ आणि ७० दरम्यान असते. या गंभीर रुग्णांना पहिले ६ ते ७ तास मोफत ऑक्सीजन सेवा पुरवण्यात येते यामुळे त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात बेड मिळवण्यास पुरेसा वेळ मिळतो.

दुसरे म्हणजे जेव्हा रुग्णालयातून मदत मागितली जाते तेव्हा त्यांना मदत पुरवण्यात येते. यामध्ये कोरोना जंबो सेंटरही मदत मागतात. तिसरे म्हणजे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांनाही ऑक्सीजनची गरज असते अशा नागरिकांना ३ ते ४ दिवसांकरिता ऑक्सीजन सेवा पुरवण्यात येते. कोरोनावर मात केली आहे परंतु त्यांना ऑक्सीजनची गरज आहे. असे रुग्ण ऑक्सीजनमुळे बेड खाली करत नाहीत अशा रुग्णांना ऑक्सीजन पुरवून बेड खाली करण्याचे काम चीनू यांची टीम करते.

पुणे- दिल्लीमध्येही ऑक्सीजन सेवा पोहचवणार

चीनू यांच्या मदतकार्यात आणखी दोन संस्था हातभार लावणार आहेत. यामुळे येत्या शनिवार किंवा रविवारी मदत मिळाल्यावर चीनू ३५ सिलेंडर दिल्ली आणि ३५ सिलेंडर पुण्याला देण्याची योजना केली आहे. तसेच ५० सिलेंडर मुंबईत वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी चीनू क्वात्रा पहाटे ४ वाजेपर्यंत काम करत आहेत. यानंतर थोडा आराम करुन ८.३० वाजल्यापासुन पुन्हा रुग्णांच्या मदतीसाठी तत्पर असतात. चीनू यांच्या ऑक्सीजन सेवाचे तीन हेल्पलाईन नंबर आहेत. यावर दिवसाला २५० ते ३०० फोन फक्त ऑक्सीजनच्या मदतीसाठी येत असतात.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -