मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती, बलात्कार करुन गुप्तांगात घुसवला रॉड

rape

मुंबईत निर्भया घटनेची पुनरावृत्ती करणारी संतापजनक घटना घडली आहे. ३० वर्षीय महिलेवर बलात्कार करुन आरोपींनी गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील साकीनाका येथे ही घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे.

मुंबईतील साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ माजली असून संतापाचं वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटे साडे तीनच्या सुमारास कंट्रोल रुमला साकीनाका येथील खैरानी रोडवर एक महिला रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध असल्याची माहिती देणारा फोन आला. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आणि अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच पीडित महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. पीडितेवर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक केली असून अजून आरोपी यामध्ये सहभागी असावेत असा पोलिसांना संशय असून तपास सुरु केला आहे.