कल्याणमध्ये गणेशोत्सवात एकत्र आलेले ३२ जण कोरोनाबाधित!

corona

कल्याणमध्ये गणेशोत्सवाच्या दरम्यान एकत्र आलेल्या ३२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कल्याणच्या जोशीबाग परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे सध्या परिसरात एकच खळबळ माजली आहे.

कल्याण मधील जोशीबाग परिसरात चार मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये ४० जणांचे कुटुंब वास्तव्यास होते. ज्यामध्ये पाच भाऊ, त्यांची सात मुलं आणि नातवडं असे संपूर्ण कुटुंब वास्तव्य करत होते. गणेशोत्सवात सातत्याने हे ४० जणांचे कुटुंब संपर्कात आले होते. गणेश पुजन, आरती यासाठी या कुटुंबातील सदस्य सतत एकमेकांच्या सोबत राहत होते. या दरम्यान एका मुलाला कोरोनाची काही लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मग उर्वरित ३९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. एकूण ३२ जणांना कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये सर्व वयोगटाचा समावेश आहे. सध्या या ३२ जणांवर कल्याणच्या वेगवेगळ्या तीन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान ‘गर्दी करून नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, एकत्र येणे टाळा’, असे आवाहन केडीएमसी आयुक्तांकडून आणि प्रशासनाकडून सातत्याने केले जात होते. मात्र तरीसुद्धा गणेशोत्सवात लोकं एकत्र आल्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे.


हेही वाचा – पुण्यातला कोरोना रोखण्यासाठी अखेर शरद पवारांचा पुढाकार