वरळीकरांसाठी ३७५ रुग्णशय्यांचे कोविड केंद्र ; आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

वरळीतील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथील विद्यमान समर्पित कोरोना आरोग्य केंद्रातील रुग्णशय्यांची क्षमता येत्या आठवड्याभरात वाढवून ५०० वरुन ८०० इतकी करण्यात येणार आहे.

375 beds Covid center for Worlikars; Inauguration by Aditya Thackeray
वरळीकरांसाठी ३७५ रुग्णशय्यांचे कोविड केंद्र ; आदित्य ठाकरेंच्या हस्ते लोकार्पण

मुंबईत कोरोना रुग्णांची वाढती संख्या व बेडची कमतरता लक्षात घेता मुंबई महापालिकेने वरळीतील नेहरु विज्ञान केंद्रात १५० रुग्णशय्या क्षमतेचे समर्पित कोरोना आरोग्य केंद्र आणि पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयात २२५ रुग्णशय्या क्षमतेच्या कोविड काळजी केंद्राचे उभारले आहे. या केंद्राचे लोकार्पण राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आले.

याप्रसंगी, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर, जी/दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्ष दत्ता नरवणकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) संजीव जयस्वाल, नगरसेविका व माजी महापौर हेमांगी वरळीकर, नगरसेवक संतोष खरात, उपायुक्त (परिमंडळ २) विजय बालमवार, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वरळीतील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय) येथील विद्यमान समर्पित कोरोना आरोग्य केंद्रातील रुग्णशय्यांची क्षमता येत्या आठवड्याभरात वाढवून ५०० वरुन ८०० इतकी करण्यात येणार आहे.
त्यामुळे नेहरु विज्ञान केंद्र, पोद्दार महाविद्यालय व एनएससीआय मिळून एकूण १,१७५ रुग्णशय्या उपलब्ध होवून कोविड बाधितांवरील उपचारांसाठी मोठी सोय होणार आहे. विशेष म्हणजे या सर्व रुग्णशय्यांमधील एकूण ७० टक्के रुग्णशय्या ऑक्सिजन पुरवठ्याच्या सुविधांसह उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.


हेही वाचा – Lockdown : चणा, तूरडाळ, साखर,तेल, मीठ रेशनकार्डवर द्या, भुजबळांचे पत्र