परमबीर सिंह सचिन वाझे भेट घडवणाऱ्या एस्कॉर्टमधील ‘त्या’ ४ पोलिसांची चौकशी सुरू

चौकशीचा प्राथमिक अहवाल महिनाभरात समोर येईल आणि त्यानुसार यातील दोषींवर कठोर करवाई केली जाईल असे मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

4 cops of Escort Navi Mumbai Police interrogation started who meeting of Parambir Singh and Sachin vaze
परमबीर सिंह सचिन वाझे भेट घडवणाऱ्या एस्कॉर्टमधील 'त्या' ४ पोलिसांची चौकशी सुरू

बडतर्फ सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझेला मुंबईतील चांदीवाल आयोगासमोर हजर करण्यात आले. त्याला आयोगासमोर हजर करण्यासाठी सचिन वाझेच्या एस्कॉर्ट टीममधील नवी मुंबईचे ४ पोलीस अधिकारी होते. दरम्यान चौकशीनंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची बंद दाराआड दहा मिनीटे चर्चा झाली. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांची भेट घडवणारे नवी मुंबईचे चार पोलीस  अडचणीत सापडले आहे. या प्रकरणी सचिन वाझेच्या एस्कॉर्ट टीम मधील नवी मुंबईचे तीन पोलीस कॉन्स्टेबल आणि एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीचा प्राथमिक अहवाल महिनाभरात समोर येईल आणि त्यानुसार यातील दोषींवर कठोर करवाई केली जाईल असे मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह यांनी फ्रि प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून अहवाल प्राप्त झाला असून आता डीसीपी अभिजीत शिवथरे यांच्याकडून चौकशी केली जात आहे. परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीसंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आक्षेप घेत मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशीचे आदेश दिले होते.

सोमवारी परमबीर सिंग यांना सकाळी चांदीवाल आयोगाच्या कार्यलयात आणण्यात आले होते आणि त्याचवेळी तळोजा कारागृहातून सचिन वाझेची चौकशी करण्यासाठी देखील चांदीवाला आयोगासमोर हजर करण्यात आले होते. चौकशीनंतर सचिन वाझे आणि परमबीर सिंह समोरासमोर आले आणि त्यांची भेट घडवण्यात आली. चांदीवाल आयोगाच्या बाहेरील खोलीत त्यांच्यात जवळपास दहा मिनिटे चर्चा झाली. चर्चेदरम्यान नवी सचिन वाझेला हजर करणाऱ्या एस्कॉर्ट टीममधील चार पोलीस खोलीबाहेर उभे होते.

सचिन वाझेला चांदीवाल आयोगाकडे घेऊन जाण्याचे काम सचिन वाझेच्या एस्कॉर्ट टीम मधील नवी मुंबई पोलिसांना देण्यात आले होते. आदेशानुसार अंडरट्रायल आरोपी कोणाशीही बोलू देऊ नये. न्यायाधीशांची पूर्व परवनागी घेऊनच आरोपींना बोलता येते. नवी मुंबई पोलिसांनी सचिन वाझेने न्यायाधीशांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणाशीही बोलणार नाही याची खात्री करुन घ्यायला हवी होती मात्र नवी मुंबई पोलिसांनी ही चूक केली त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात येत आहे. चौकशीनंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – परमबीर सिंहांचे दोन दिवसात निलंबन? राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर