घरCORONA UPDATECoronaVirus: महापालिकेच्या ४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

CoronaVirus: महापालिकेच्या ४ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू

Subscribe

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील तसेच बिगर अत्यावश्यक सेवेतील कामगार, कर्मचारी अर्थात सैनिकांची योग्यप्रकारे काळजी न घेतल्याने आतापर्यंत चार जणांचे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनाविरोधातील युध्दात पहिल्या दिवसापासून लढा देणाऱ्या महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील तसेच बिगर अत्यावश्यक सेवेतील कामगार, कर्मचारी अर्थात सैनिकांची योग्यप्रकारे काळजी न घेतल्याने आतापर्यंत चार जणांचे मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, ज्या विभागातील कामगार, कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, त्या विभागाची माहिती घेवून त्यांना सुरक्षा पुरवण्याचा प्रयत्न अद्यापही महापालिकेकडून होत नाही. त्यामुळे कोरोना विरोधातील या युध्दात योध्दांच्या बलिदानानंतरही प्रशासनाने सतर्कता दाखवून कामगार, कर्मचाऱ्याच्या सुरक्षेबाबत योग्य उपाययोजना न आखल्यास अशाचप्रकारे सैनिकांना शहिद होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील करनिर्धारण संकलन विभागातील विभाग निरिक्षक यांच्यावर धारावी अन्न पाकिटांचे वाटप जबाबदारी होती. मात्र, या विभाग निरिक्षकाचा चार दिवसांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. त्यानंतर एफ-दक्षिण विभागाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुकादमाचेही निधन झाले आहे. याशिवाय शताब्दी रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याचे राजावाडी रुग्णालयात तर एन विभागातील वसाहत खात्यातील भाडे संकलक यांचेही निधन झाले आहे. भाडे संकलन पवईतील म्हाडा येथील एमसीएसीआर येथील कोरोना संबंधित कामे करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. चारही कर्मचारी कोरोना कोविडच्या कामांमध्ये सहभागी झाले होते.

जी-उत्तर मधील त्या विभाग निरिक्षकाचे कुटुंब रुग्णालयात

जी-उत्तरमधील ज्या विभाग निरिक्षकाला कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्या निरिक्षकाच्या मोठ्या मुलीचा अहवाल निगेटिव्ह आला असून आई,पत्नी आणि छोट्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामधील आईला बोरीवली पश्चिम येथील अॅपेक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दहा वर्षाच्या मुलीसह त्यांच्या पत्नीला बोरीवलीतच क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. याच ठिकाणी एका स्वतंत्र खोलीत त्यांच्या मोठ्या मुलीला ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या या कुटुंबावर आभाळ कोसळलेले असताना, त्यांच्या आईला रुग्णालयात आणि बायको, मुलींना क्वारंटाईनमध्ये राहावे लागत असून महापालिकेच्या कुटुंबाचा भाग असूनही महापालिकेच्यावतीने त्यांची विशेष काळजी घेतली जात नाही.

मास्क, हातमोजांचा अभावच

जेवण वाटप करण्याची वितरण प्रणाली हाताळणाऱ्या धारावीतील करनिर्धारण व संकलन विभागाच्या विभाग निरिक्षकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विभाग निरिक्षकाच्या मृत्यू हा महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे झाला असून जेवण वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क तसेच हातमोजे उपलब्ध करून दिले जात नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. याचमुळे जेवण वाटपाची ५० टक्के यंत्रणा कोलमडून पडली आहे. आतापर्यंत सलग कामाला बोलावले जात असून एकही दिवस सुट्टी दिलेली नाही. त्यामुळे कामाचा ताणही या विभागाच्या कर्मचाऱ्यांवर असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -