ठाण्यात पुन्हा पारा चढला

४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

होळीच्या दिवशी ठाणे शहराचे तापमान आतापर्यंत सर्वाधिक ४५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले असतानाच बुधवारी पुन्हा ठाण्याच्या तापमानाने ४४.१ अंश सेल्सिअसचा आकडा गाठला. हे तापमान पालघर आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांपेक्षा अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाण्यात सरासरी ३० अंश सेल्सिअस तापमान दरवर्षी असते, मात्र यंदा तापमान प्रचंड वाढल्याने ठाणेकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. दुपारी बाहेर पडण्यापेक्षा ऑफिस आणि घरात राहणेच ठाणेकरांकडून पसंत केले जात आहे.

हवामान विभागाने मुंबई, रायगड, पालघरसह ठाणे जिल्ह्यातही १४ ते १६ मार्च या कालावधीत उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार ठाण्याचा पारा ३५ अंशांच्या पुढे जाऊ लागला. तो आकडा आता जवळपास ४० अंशांच्या आसपास किंवा त्याच्याही पुढे जाताना वारंवार दिसून येत आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे १६ मार्चला ठाण्याचे तापमान ४४ अंशांवर पोहचले होते. त्यानंतर ते तापमान कमी होईल असे वाटत असताना दुसर्‍याच दिवशी (होळीच्या दिवशी) म्हणजे १७ मार्चला ४५.६ अंशांवर गेले होते. हे आतापर्यंत ठाण्यातील सर्वाधिक तापमान होते. या तापमानाची तुलना विदर्भाशी केली गेली. १९ ते २२ मार्चदरम्यानचे तापमान ३५ ते ४०च्या आसपास होते, मात्र त्यातच बुधवारी अचानक तापमान ४४.१ अंशांवर गेले.

ठाणेकर नागरिकांनी हा वाढता उकाडा नकोसा झाला आहे. अंगातून घामाच्या धारा वाहत असल्याने आणि अंगाला चटके लागत असल्याने ऑफिस आणि घरात पंख्याखाली किंवा एसीमध्ये बसणे नागरिकांकडून पसंत केल्याचे पाहण्यास मिळत आहे. हे तापमान असेच राहिल्यास एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत जीव नकोसा होईल, अशी भीतीही ठाणेकर नागरिकांकडून वर्तवली जाऊ लागली आहे.

ठाण्यातील तापमानाचा तक्ता
तारीख  – तापमान
१६ मार्च २०२२ ४४
१७ मार्च २०२२ ४५.६
१८ मार्च २०२२ ४३.२
१९ मार्च २०२२ ३९.९
२० मार्च २०२२ ३५.२
२१ मार्च २०२२ ३९.४
२२ मार्च २०२२ ३७.६
२३ मार्च २०२२ ४४.१