आगामी मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी ‘त्या’ संशयास्पद ४५ प्रभागांची पुनर्रचना करा; रवी राजा यांची मागणी

भाजपने मागील पालिका निवडुकांच्या वेळी केलेली ४५ प्रभागांची पुनर्रचना संशयास्पद आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

45 dubious wards have to be reshuffled before the upcoming bmc elections says Ravi Raja

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात भाजपची सत्ता होती. त्यामुळे त्यांनी काही प्रभागांची पुनर्रचना केली होती आणि त्यामुळे भाजपच्या ४०-५० जागांची वाढ झाली. आता अशा किमान ४५ संशयास्पद प्रभागांची पुनर्रचना करण्यात यावी, अशी मागणी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक घेण्यावर मुंबई महापालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगानेही पालिका यंत्रणेला निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

अनपेक्षितपणे ४०-५० जागांची वाढ

मुंबई महापालिकेची मागील निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये पार पडली. त्यावेळी राज्यात भाजपची सत्ता होती. त्याचा लाभ घेऊन भाजपने मुंबईतील काही प्रभागांची रचना आपल्याला फायदा होईल या पद्धतीने बदलली. त्या प्रभागांची पुनर्रचना फायदेशीर होईल अशा पद्धतीने करण्यात आली होती. त्यामुळेच त्या निवडणुकीत भाजपच्या जागांमध्ये अनपेक्षितपणे ४०-५० जागांची वाढ झाली होती, असा गंभीर आरोप रवी राजा यांनी केला आहे.

प्रभागांच्या भौगोलिक पुनर्रचनेत सुधारणा गरजेची

भाजपने त्यावेळी केलेली ४५ प्रभागांची पुनर्रचना संशयास्पद आहे. या प्रभागांच्या भौगोलिक पुनर्रचनेत सुधारणा होणे गरजेचे आहे. येत्या २०२२ च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी यात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी पालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.