घरमुंबईगणेश विसर्जनाला गालबोट: वर्सोवा येथील समुद्रात ५ मुले बुडाली; दोघांचा मृत्यू, तर...

गणेश विसर्जनाला गालबोट: वर्सोवा येथील समुद्रात ५ मुले बुडाली; दोघांचा मृत्यू, तर २ बचावले

Subscribe

मुंबईत संपूर्ण गणेशोत्सवात गौरी, गणेश विसर्जनात कुठेही विघ्न आले नाही; मात्र अनंत चतुर्दशीदिनी रात्री ९ वाजताच्या सुमारास वर्सोवा जेट्टी येथे गणेशविसर्जन करताना पाच तरुण मुले दुर्दैवाने समुद्रात बुडाली. त्यांचा पोलीस, अग्निशमन दल व स्थानिक कोळी बांधव यांनी बोटीद्वारे कसून शोध घेतला असता दोघेजण सुखरूप सापडले असून त्यांच्यावर नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दोघांचे मृतदेह सोमवारी हाती लागले असून आणखीन एकजण अद्यापही बेपत्ता आहे. या दुर्घटनेमुळे सदर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या दुर्घटनेत मृत पावलेल्या दोघांची नावे शुभम रंजनलाल निर्मळ (१८) व संजय हिरामन तावडे (२०) अशी आहेत. तर बचावलेल्या मुलांची नावे शिवम रंजनलाल निर्मळ (१९) आणि विजय रोहिदास मराठे (१८) असे असल्याचे समजते. शिवम याच्यावर एचबीटी रुग्णालयात तर विजय याच्यावर कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत बेपत्ता मुलाचे नाव अद्याप समजलेले नाही. मात्र पोलीस, स्थानिक लोक व अग्निशमन दलाकडून त्याचा कसून शोध सुरू आहे.

- Advertisement -

यंदा कोरोनामय वातावरणात नियमांचे पालन करून लाखो मुंबईकरांनी श्रीगणेशोत्सव साजरा केला. सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवात गणेशभक्तांनी स्वतःवर काही प्रमाणात मर्यादा घालून गणेशाची विधिवत पूजाअर्चा करून समुद्र, तलाव, खाडी अशा ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळी आणि १७३ कृत्रिम तलाव अशा २४६ विसर्जन स्थळी श्रीगणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दहा दिवसांच्या कालावधीत १ लाख ५७ हजार २२९ गणेशमूर्तींचे आणि ६ हजार ५३२ गौरी, हरतालिकांचे असे एकूण १ लाख ६४ हजार ७६१ गणेशमुर्तीं, गौरी, हरतालिका यांचे निर्विघ्नपणे विसर्जन करण्यात आले.


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -