२५ दिवसांत ५ लाख परप्रांतीय मुंबईत परतले!

मराठी माणूस विचारतो : गावाला जायला परवानगी मिळेल का हो?

migrant workers

करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर हाताला काम आणि पोटाला भाकरी नसल्याने मिळेल त्या वाहनाने गावी गेलेले मुंबईतील परप्रांतीय मजूर आता पुन्हा मोठ्या संख्येने मुंबईत परतू लागले आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दोन एक महिन्यातच त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने मातृभूमीपेक्षा त्यांना शेवटी कर्मभूमीची ओढ लागली. शेवटी मुंबईच त्यांना जगवणार असल्याने त्यांच्यासमोर कुठलाच पर्याय नव्हता, परिणामी १ जून ते २५ जून या २५ दिवसांच्या कालावधीत विशेष ट्रेनच्या माध्यमातून ४ लाख, ८१ हजार ९८३ परप्रांतीय मजूर मुंबईत परतले आहेत. मुंबईत परतणार्‍या मजुरांमध्ये सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशची आहे. विशेष म्हणजे परप्रांतीय गावाला जाऊन परतले तरी मराठी माणूस अजून विचारतोय, ‘गावाला जायला परवानगी मिळेल का हो?’

लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून कोकण आणि राज्यभरातील भूमिपुत्र मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे शहरात अडकून पडले आहेत. मराठी माणसांना आपल्या गावी जाण्यासाठी राज्य सरकारकडून कसलीही सुविधा आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. मात्र, महाविकास आघाडी सरकारने आपल्या भूमिपुत्रांना वार्‍यावर सोडून परप्रांतीयांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला होता. यासाठी राज्यातील तिजोरीतून २०० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आला. परप्रांतीयांना रेल्वे आणि एसटीतून निःशुल्क प्रवास देऊन त्यांच्या गावी पाठवण्यात आले. मात्र एका घरात खाणारी संख्या जास्त आणि आहे त्या शेतीत भागत नसल्याने गावी गेलेले हे परप्रांतिय अस्वस्थ होते. मुख्य म्हणजे त्यांच्या सरकारकडे त्यांच्या हाताला काम देण्याची क्षमता नसल्याने निराश होऊन त्यांनी मुंबईचा रस्ता धरला आहे, अशी माहिती त्यांच्याशी बोलताना दिसून आली.

राज्यात ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक कामे सुरू झाली आहेत. याचा फायदा घेत आणि आपल्या गावी भुकेकंगाल होण्यापेक्षा परप्रांतीय मजुरांनी पुन्हा रेल्वेच्या माध्यमातून मुंबईची वाट धरली आहे. आतापर्यंत सुमारे पाच लाख मजूर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात परतले असून त्यांनी आपल्या कामाची सुरुवात सुद्धा केली आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून महाराष्ट्रात शहरांमध्येअडकून पडलेल्या मराठी कामगारांच्या प्रवासासाठी अद्यापही राज्य सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केलेली नाही. या घटकेलाही जिल्हा बंदी प्रवास बंद आहे. त्यामुळे भूमिपुत्रांनी ठाकरे सरकारच्या उदासीन धोरणाबद्दल मोठी नाराजी व्यक्त केली आहे.

दिवसाला २० हजार परप्रांतीय मुंबईत
लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागांत अडकलेल्या मजुरांच्या घरवापसीसाठी रेल्वेतर्फे श्रमिक ट्रेन चालविण्यात आल्या होत्या. तर १२ मे पासून राजधानी स्पेशल ट्रेन धावत आहेत, १ जूनपासून सामान्य नागरिकांसाठी निवडक मार्गावर २०० ट्रेन सुरू करण्यात आलेल्या आहेत. सर्वाधिक ट्रेन या मुंबईत येणार्‍या आहेत. जून महिन्यात मुंबईच्या रेल्वे स्थानकावर दररोज १५ ते २० हजार परप्रांतीय मजूर दाखल होत आहेत. १ जूनपासून ते २५ जूनपर्यंत आतापर्यंत मुंबईत ४ लाख ८१ हजार ९८३ परप्रांतीय मजूर मुंबईत परतले आहेत. मुंबईत रेल्वेची पाच प्रमुख टर्मिनल असून त्यात सीएसएमटी, दादर, एलटीटी, मुंबई सेंट्रल आणि बांद्रा टर्मिनसचा समावेश आहे. या ठिकाणी दररोज सुमारे १५ ते २० हजार प्रवासी या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून ते दाखल होत आहेत.

उत्तर प्रदेश = १ लाख ९१ हजार ७४१
बिहार = ८३ हजार ५१५
राजस्थान = ५८ हजार ३६४
पश्चिम बंगाल = २२ हजार ५६५
केरळ = १७ हजार २
कर्नाटक = १९ हजार १०७
तेलंगणा = ११ हजार १७५
पंजाब, हरियाणा व दिल्ली = ७८ हजार ४२४
===========================
एकूण मजूर = ४ लाख, ८१ हजार, ९८३
=============================