घरमुंबई५०० किलो रद्दीने अनाथ मुलांच्या चेहर्‍यावर हसू

५०० किलो रद्दीने अनाथ मुलांच्या चेहर्‍यावर हसू

Subscribe

मुंबईतील फूटपाथवर किंवा नाक्यावर आपल्याला नेहमी अनाथ लहान मुले आढळून येतात. कुटुंबाचे छप्पर हरवलेल्या या मुलांच्या चेहर्‍यावर आनंदाचा एक क्षण आणण्यासाठी खार येथील श्री मुंबादेवी विद्यामंदिर (आयसीएसई) शाळेने स्तुत्य उपक्रम हाती घेत, अनोख्या पध्दतीने बालदिन साजरा करण्याचा निश्चय केला आहे. कुटुंबाशिवाय राहणार्‍या, फूटपाथवर दिवस-रात्र फिरणार्‍या या मुलांसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क आपले घर आणि शाळेतून सुमारे ५०० किलो रद्दी गोळा केली. या रद्दीच्या माध्यमातून जमा झालेली हजारो रुपयांची रक्कम विद्यार्थी शाळेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील एका चर्चला देणार आहेत. रद्दीच्या माध्यमातून मिळवलेल्या या रकमेतून रस्त्यावरील मुलांच्या जेवणाचा आणि शिक्षणाचा खर्च उचलण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या मदतीने केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून बालदिनाच्या निमित्ताने या शाळेतील विद्यार्थ्यांनी फुटपाथवरील मुलांसाठी ही धडपड करीत उभ्या मुंबईकरांसाठी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

मुंबईसह जगभरात बुधवारी बाल दिन साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने अनेक शाळा आणि पालक मुलांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पण मुंबईतील फूटपाथवर कुटुंबाशिवाय राहणार्‍या लहान मुलांसाठी हा दिवस नेहमीचाच. या मुलांच्या चेहर्‍यावरील चिंता आणि दु:ख कमी करण्याचा निर्णय खार येथील ‘खार एज्युकेशन सोसायटी’च्या श्री मुंबादेवी विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतला. आपल्याप्रमाणेच रस्त्यावरच्या मुलांना बालदिन साजरा करता यावा म्हणून त्यांनी शक्कल लढवली.

- Advertisement -

शाळेतील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील वृत्तपत्रे आणि इतर रद्दीचे साहित्य प्रत्येक महिन्यात शाळेत गोळा करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जूनपासून शाळेतील ३०० विद्यार्थ्यांनी सुमारे ५०० किलो रद्दी जमा केली. ज्यात शाळा प्रशासनाने देखील शाळेतील शाळेतील वृत्तपत्रांची रद्दी देऊन उपक्रमाला हातभार लावला. या रद्दीच्या माध्यमातून हजारो रुपये गोळा झाले असले तरी रोख रक्कम संख्या पुरेशी नव्हती. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमात सहभागी होत आपल्याकडील पैसे या उपक्रमाला दिले.

विद्यार्थ्यांनी जमविलेली ही रक्कम बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज परिसरातील स्कॉट क्रिक चर्चकडे सुपुर्द करण्यात येणार आहे. या चर्चमध्ये सध्या ५० हून अधिक मुले आहेत. ज्यात प्रामुख्याने फूटपाथवर राहणार्‍या मुलांचा समावेश असून काही अनाथ मुले देखील याठिकाणी आहेत. चर्च या सर्व मुलांचा सांभाळ करीत असून त्यांचा शिक्षणाचा, जेवणाचा आणि इतर आवश्यक खर्च करत आहे. चर्चकडून या मुलांना पालिका शाळेतदेखील पाठविण्यात येते. त्यामुळे या मुलांच्या चेहर्‍यावर आनंदाचा एक क्षण मिळावा याकरिता आमच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम सुरु केला असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना चौधरी यांनी दिली.

- Advertisement -

ही रक्कम चर्चकडे सुपूर्द करण्यासाठी बुधवारी शाळेच्या ३५ विद्यार्थ्यांची टीम जाणार आहे. या विशेष टीमने चर्चमधील विद्यार्थ्यांसाठी काही विशेष कार्यक्रमाचे आयोजन देखील केले आहे. हा कार्यक्रम सादर केल्यानंतर त्यांच्याबरोबरच बालदिन साजरा केला जाणार असल्याचे शाळेकडून सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे शाळेकडून इतर ही काही आवश्यक मदत यावेळी केली जाणार आहे. बालदिनाच्या निमित्ताने मुंबादेवी विद्यामंदिर शाळेचा हा उपक्रम मुंबईतील इतर शाळांसाठी प्ररेणादायी उपक्रम ठरणार आहे, हे मात्र नक्की.

गेल्यावर्षी आमच्या विद्यार्थ्यांची एक टीम स्कॉट क्रिक चर्चमध्ये गेली होती. त्यावेळी त्यांनी, चर्चमधील अनाथ, बेघर मुलांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मुलांनी रद्दी गोळा करण्याची कल्पना आमच्या समोर मांडली. त्यानंतर वर्षभर शाळेतील पहिली ते नववीचे जवळपास सर्वच विद्यार्थी त्यांच्या घरातील रद्दी शाळेत गोळा करीत होते. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या सोयीनुसार रद्दी जमवली. ही एक मदत असल्याने आम्ही त्याची रक्कम जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. पण विद्यार्थ्यांनी बजाविलेल्या कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यापुढेही असे सामाजिक बांधालिकी जपणारे कार्यक्रम करू. – रंजना चौधरी, मुख्याध्यापिका, श्री मुंबादेवी विद्यामंदिर, खार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -