नालेसफाई आणि चर पुनर्भरणच्या ५४५ कोटींच्या कामांना मंजुरी

MLA Raees Sheikh alleges that corruption is taking place in Mumbai Municipal Corporation

पावसाळ्यापूर्वी आवश्यक नालेसफाई व चर पुनर्भरणच्या ५४५ कोटीं रुपये किमतीच्या ३० प्रस्तावांना महापालिका प्रशासक व आयुक्त डॉ. इक्बाल चहल यांनी मंजुरी दिली आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांच्या अंतर्गत मोठ्या नाल्यांमधील गाळ काढण्याबाबत ७१ कोटी रुपयांच्या ६ प्रस्तावांना तर ९१ कोटी रुपये किमतीच्या लहान नाल्यांमधील गाळ काढण्याबाबतच्या १७ प्रस्तावांना अशा एकूण २१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

यामध्ये शहर भागासाठी २, पूर्व उपनगरांसाठी ६ तर पश्चिम उपनगरांमधील ९ कामांच्या प्रस्तावांचा समावेश आहे. मुंबईतील मोठे व लहान नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी १६२ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे.

दरम्यान, पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील चर पुनर्भरणी कामांचा भाग म्हणून परिमंडळनिहाय प्रत्येकी एक अशा ७ प्रस्तावांनासुद्धा मंजुरी मिळाली आहे. त्यांची एकत्रित किंमत ३८३ कोटी रुपये इतकी आहे. तीन वर्षांच्या कालावधीसाठी ठेकेदारांची नियुक्ती करण्यासाठी ही मंजुरी मिळाल्याने उपयोगिता संस्थांना कार्यादेश देवून तातडीने कामे सुरु करता येणार आहेत.

नाल्यांमधील गाळ काढणे व चर पुनर्भरणीचे प्रस्ताव मंजूर झाल्याने ही दोन्ही महत्त्वाची कामे तातडीने सुरु करुन विहित वेळेत पूर्ण करणे प्रशासनाला शक्य होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.