मुंबईतील ५६० क्षयरोगग्रस्त रुग्णांना कोविडची बाधा ; ३७ रुग्णांचा मृत्यू

560 tb patients infected covid in Mumbai 37patients Death
मुंबईतील ५६० क्षयरोगग्रस्त रुग्णांना कोविडची बाधा ; ३७ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : मुंबईत मार्च २०२० पासून कोविड संसर्गाला सुरुवात झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे २ वर्षे २ महिन्यात मुंबईतील १ लाख १५ हजार ३९६ क्षयरोगग्रस्त रुग्णांपैकी ३७ हजार २१६ रुग्णांची कोविड चाचणी केली असता त्यापैकी ५६० (१.५० टक्के) जणांना कोविडची बाधा झाल्याची माहिती समोर आली. त्यापैकी ३७ (६.६०टक्के) रुग्णांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

यासंदर्भातील माहिती पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, डॉ.टिपरे यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.
प्राप्त माहितीनुसार,मुंबईत कोविडचा संसर्ग सुरू झाल्यापासून त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वसामान्य निरोगी व्यक्तींबरोबरच विविध रोगांनी, आजारांनी ग्रस्त रुग्णांनाही कोविडची बाधा झाल्याची व उपचारादरम्यान काही रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोविड बाधा झालेल्या रुग्णांना जर अगोदरपासूनच हृदयरोग, किडनीचा आजार, श्वसनाचा त्रास, क्षयरोग, कॅन्सर आदींसारखे गंभीर आजार असतील व त्यांनी कोविडवरील उपचार घेण्यापूर्वी त्यांची प्रकृती गंभीर झाली असेल व त्यांचे मनोधैर्य खचले असेल तर अशा परिस्थितीत त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.

त्यानुसारच २ वर्षे २ महिन्याच्या कालावधीत क्षयरोग ग्रस्त रुग्णांची एकूण संख्या १ लाख १५ हजार ३९६ एवढी नोंदविण्यात आली होती. त्यापैकी ३७ हजार २१६ रुग्णांची कोविड चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ५६० क्षयरोगग्रस्त रुग्णांना कोविडची बाधा झाली. त्यापैकी ३७ रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

५२३ क्षयरोगग्रस्त रुग्णांची कोविडवर मात

ज्या रुग्णांना अगोदरच क्षयरोगाची बाधा झालेली असताना कोविडबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांनाही कोविदचा संसर्ग झाला. मात्र ज्यांनी मनाचा कणखरपणा दाखवत निडरपणे परिस्थितीला, बिकट संकटाला तोंड दिले त्यांना मात्र आवश्यक औषधोपचाराने बरे वाटले. त्यांना मोठा दिलासा मिळाला. अशा ५२३ क्षयरोगग्रस्त रुग्णांनी कोविडवर यशस्वीपणे मात केली.

क्षयरोगी रुग्ण संख्या, कोविड बाधित व मृत

वर्ष        क्षयरोग       कोविड         कोविड     मृत
रुग्ण         चाचणी          बाधित
२०२०      ४३,४६४     १३,१५५         २९८        २५

२०२१      ५८,८४०     २०,७८०        २३२          १२

२०२२      १३,०९२     ३,२८१           ३०

———————————————————-
१,१५,३९६   ३७,२१६          ५६०         ३७

# २०२२ चा सविस्तर अहवाल येणे बाकी आहे. सध्या काम चालू आहे.