मुंबई : मुंबईतील धूळ व वायू प्रदूषणाबाबत न्यायालयाने फटकारले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन कामाला लागले आहे. मुंबईतील धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी 574 किमी लांबीच्या रस्त्यांची धुलाई सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी पिण्याच्या व्यतिरिक्त इतर स्रोतांमधून पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असा दावा मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आला आहे. (584 km in Mumbai for dust control Road washing works in progress Municipal claim)
वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने मुंबई महापालिकेने विविध उपाययोजनांना गती दिली आहे. याअंतर्गत सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये 60 फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करुन ते पाण्याने धुवून काढण्याची कामे वेगाने केली जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुंबईत टप्प्याने जास्तीत जास्त रस्ते धुण्याचे उद्दिष्ट निश्चित करत महापालिका प्रशासनाने त्यादृष्टीने नियोजन केले असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
मुंबईतील वायू प्रदूषण आणि त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने सक्रिय पावले उचलावीत, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केली होती. मुंबईसह महानगरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका, तसेच राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी एकत्रित कार्यवाही करावी. प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये नागरिकांना सहभागी करून घेत लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, असे निर्देश देखील मुख्यमंत्री यांनी दिले होते. त्यानुसार, महापालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या सर्व 24 प्रशासकीय विभागांमध्ये रस्ते, पदपथ धुवण्याची कामे वेगाने सुरू आहेत.
यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले की, मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यातून धूळ पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावेत. त्याचबरोबर साचलेली धूळ हटवण्याची कार्यवाही करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार रस्ते आणि पदपथ यावरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी, महापालिकेच्या वतीने वाहन आधारित धूळ प्रतिबंधक यंत्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यासोबतच, सर्व प्रशासकीय विभागांमध्ये प्रामुख्याने जिथे वर्दळ अत्याधिक आहे, अशा परिसरांमध्ये रस्ते, पदपथ यांची विशेष स्वच्छता तसेच पाण्याचे धुवून काढण्याची कार्यवाही वेगाने केली जात आहे. सध्या संपूर्ण मुंबईत 584 किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्यात येत आहेत. यात पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग, पूर्व मुक्त मार्ग यांसह स्वामी विवेकानंद मार्ग, वांद्रे ते सांताक्रूज पश्चिम यांना जोडणारा जोड मार्ग आणि लालबहादूर शास्त्री मार्ग आदींचा समावेश आहे.
हेही वाचा : ‘वंचित’च्या संविधान सन्मान महासभेचे राहुल गांधींना निमंत्रण; प्रकाश आंबेडकर यांची माहिती
या यंत्राचा केला जात आहे वापर
या स्वच्छता कामांसाठी पाण्याचे 121 टँकर आणि स्लज डिवॉटरींग, फायरेक्स टँकर, सूक्ष्मजल फवारणी यंत्र यांचादेखील वापर केला जात आहे. प्रशिक्षित मनुष्यबळही नेमण्यात आले आहे. विशेष म्हणजे पुनर्प्रक्रिया केलेल्या तसेच स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा यामध्ये प्रामुख्याने वापर केल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे, असे अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी नमूद केले.
हेही वाचा : मराठा-ओबीसी म्हणजे इंडिया- पाकिस्तानचे लोक नाहीत; संभाजीराजे छत्रपतींची भूमिका
स्वच्छतेच्या प्रतीक्षेत आणि स्वच्छ झालेले रस्ते
ए/विभाग : 18 रस्ते, 21. 89 किमी
बी/विभाग : 5 रस्ते, 12.20 किमी
सी/विभाग : 12 रस्ते, 18.16 किमी
डी/ विभाग : 17 रस्ते, 23.27 किमी
ई/विभाग : 19 रस्ते, 11.11 किमी
एफ/उत्तर विभाग : 18 रस्ते, 20.50 किमी
एफ/दक्षिण विभाग : 13 रस्ते, 20.00 किमी
जी/उत्तर विभाग : 11 रस्ते, 60.60 किमी
जी/दक्षिण विभाग : 11 रस्ते, 19.45 किमी
एच/पूर्व विभाग : 15 रस्ते, 14.40 किमी
एच/पश्चिम विभाग :13 रस्ते, 26.35 किमी
के/पूर्व विभाग : 8 रस्ते, 28.15 किमी
के/पश्चिम विभाग : 8 रस्ते, 16.79 किमी
पी/उत्तर विभाग : 10 रस्ते, 21.10 किमी
पी/दक्षिण विभाग : 15 रस्ते, 23.91 किमी एल/विभाग : 11 रस्ते, 21.50 किमी
एम/पूर्व विभाग : 06 रस्ते, 11.00 किमी
एम/पश्चिम विभाग :16 रस्ते, 34.40 किमी
एन/विभाग : 12 रस्ते, 16.70 किमी
एस/विभाग : 07 रस्ते, 18.00 किमी
टी/विभाग : 08 रस्ते, 13.50 किमी
आर/मध्य विभाग : 10 रस्ते, 21.70 किमी
आर/उत्तर विभाग :10 रस्ते, 24.42 किमी
आर/ दक्षिण विभाग : 10 रस्ते, 19.70 किमी
मुख्यमंत्री करणार कामाची पाहणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (21 नोव्हेंबर) पहाटे मुंबईतील स्वच्छता आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची स्वतः उपस्थित राहून पाहणी करणार आहेत. यामध्ये सकाळी सहा वाजता कलानगर फ्लायओव्हर पासून वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे मार्गे सांताक्रूझ मिलन सबवे पर्यंत, सकाळी 6.20 मिनिटांनी मिलन सबवे ते नेहरू जंक्शन रोड, नेहरू रोड, दयालदास रोड, पायावाडी रोड, मिलन सबवे ब्रिज पासून रेल्वे ट्रॅकपर्यंत, सकाळी 6.40 वाजता एचडब्ल्यू (HW) वॉर्ड मिलन सबवे ब्रिज रेल्वे ट्रॅक ते एसव्ही रोड जंक्शन, साने गुरुजी रोड ते रिलीफ रोड, रिलीफ रोड ते जुहू तारा रोड, जुहू तारा रोड ते जुहू तारा लिंकिंग रोड जंक्शन लिंकिंग रोड,टर्नर रोड,कार्टर रोड या ठिकाणाची पाहणी करणार आहेत.