घरमुंबईउन्हाळ्याच्या सुटीकरिता मध्य रेल्वेच्या ६० स्पेशल ट्रेन

उन्हाळ्याच्या सुटीकरिता मध्य रेल्वेच्या ६० स्पेशल ट्रेन

Subscribe

 पनवेल-सावंतवाडी ४० तर पुणे-सावंतवाडी २०, कोकणातील प्रवाशांना मिळणार दिलासा

उन्हाळाच्या सुट्टीत मुंबईतून कोकणात जाणार्‍यांची संख्या जास्त असते. त्यामुळे कोकणात जाणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ६० स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल ते सावंतवाडी आणि पुणे ते सावंतवाडी दरम्यान या स्पेशल गाड्या धावणार आहेत. या गाड्यांचे तिकीट दर स्पेशल ट्रेनप्रमाणे आकारण्यात येणार आहे. त्यामुळे उन्हाळाच्या सुट्टीत जाणार्‍या कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोकणात जाणार्‍या प्रवाशांचे रेल्वे प्रवासात नेहमी हाल होत असते. विशेष सुट्टीच्या काळात तर कोकणात जाणार्‍या प्रवाशांना रेल्वे तिकीट मिळत नाही. त्यामुळे खासगी वाहनांच्या माध्यमातून गाव गाठावे लागते. मध्य रेल्वेने कोकणात जाणार्‍या प्रवाशांच्या सुविधेसाठी 60 विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या 60 पैकी 40 पनवेल ते सावंतवाडी दरम्यान तर पुणे-सावंतवाडीच्या दरम्यान 20 विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार आहेत.

- Advertisement -

पनवेल ते सावंतवाडी ०१४१३ ही स्पेशल ट्रेन ६ एप्रिल ते ९ जून दरम्यान दर शनिवार, रविवार सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ८ वाजता सावंतवाडीला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१४१४ स्पेशल ट्रेन ५ एप्रिल ते ८ जून दरम्यान दर शुक्रवार, शनिवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी सुटून पनवेलला दुसर्‍या दिवशी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी पोहोचणार आहे. या ट्रेनला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.

पुणे-सावंतवाडी स्पेशल ट्रेनच्या २० फेर्‍या होणार आहेत. ०१४११ स्पेशल ट्रेन ५ एप्रिल ते ७ जून दरम्यान दर शुक्रवारी पहाटे ४ वाजून ५५ मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ८ वाजता सावंतवाडीला पोहोचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी ०१४१२ स्पेशल ट्रेन ७ एप्रिल ते ९ जून दरम्यान दर रविवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी सुटून पुण्याला दुसर्‍या दिवशी दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी पोहोचणार आहे. या ट्रेनला लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे. या दोन्ही गाड्यांना एसी चेअर कारचे २, सेकण्ड सीटींगचे ११ कोच असणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -