पहिल्या दिवशी शाळांमध्ये आले ७० टक्के विद्यार्थी; मुलांच्या चेहर्‍यांवर मित्रभेटीचा आनंद

शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरी अद्यापही त्या पूर्णक्षमतेने भरलेल्या दिसून आल्या नाहीत.

school

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुंबईतील सर्व शाळा पूर्णवेळ व पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला. त्यानुसार २ मार्चला सुरू झालेल्या मुंबईतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ७० टक्के उपस्थिती दिसून आली. शाळा पुन्हा एकदा गजबजल्या असून, मुलाचा उत्साह व मित्रांना बर्‍याच दिवसांनी भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर ओसडून वाहत होता. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असली तरी अद्यापही त्या पूर्णक्षमतेने भरलेल्या दिसून आल्या नाहीत.

कोरोनाची पार्श्वभूमी विचारात घेऊन मुंबई महापालिका आयुक्तांनी २ मार्चपासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व बोर्डच्या, सर्व माध्यमाच्या पूर्व प्राथमिक ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा कोविड -१९ पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार २ मार्चला मुंबईतील २२४९ शाळा पूर्णक्षमतेने सुरू करण्यात आल्या. यामध्ये पालिकेच्या ११४७ तर खासगी ११०२ शाळा आहेत. महापालिकेच्या ११४७ शाळांमध्ये २ लाख ९३ हजार २९२ इतके विद्यार्थी असून, त्यापैकी बुधवारी २ लाख ३ हजार २०६ इतकेच विद्यार्थी उपस्थित होते. तर ११०२ खासगी प्राथमिक शाळेतील ३ लाख ८९ हजार ७७३ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ७६ हजार ७३९ विद्यार्थी उपस्थित होते, अशी माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.

पालकांच्या मनात अद्यापही कोरोनाची भीती कायम आहे. तसेच काही शाळांची पूर्वतयारी झाली नसल्याने त्या शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासंदर्भातील सूचना दिल्या नव्हत्या. मात्र शाळांची तयारी पूर्ण झाल्यावर आणि पालकाच्या मनातील भीती कमी झाल्यावर विद्यार्थ्यांची संख्या १०० टक्क्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वासही शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी व्यक्त केला.