बोरिवलीतील ८५ वर्षीय साळवी आजोबांनी केली कोरोनावर मात

85 year old man racover from corona in borivali
बोरिवलीतील ८५ वर्षीय साळवी आजोबांनी केली कोरोनावर मात

कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होत असल्याने लोकांमध्ये या आजाराबाबत भीतीचे वातावरण पसरलेले असून वयोवृद्ध माणसांना जर याची बाधा झाली तर ती व्यक्ती जगणे नाहीच, असा काहीसा प्रचार सध्या सुरू आहे. पण या भीतीवर मात केली ती ८५ वर्षांच्या आजोबांनी. कांदिवली येथे राहणाऱ्या वसंत साळवी यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना बोरिवलीतील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आणि तब्बल एक महिन्यानंतर या आजारातून पूर्ण बरे होत हे आजोबा घरी परतले. एका प्रकारे या आजोबांनी इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मात करत भीतीच्या छायेखाली असणाऱ्या प्रत्येकासाठी एक आदर्श निर्माण केला आहे.

सध्या कोरोनाच्या भीतीने लोकांच्या मनात घर केले आहे. कोरोना झाला म्हणजे तो रुग्ण बरा होतच नाही. त्यातच ती व्यक्ती साठीची पुढची असेल तर वाचणे नाही, असा काहीसा (गैर) समज लोकांनी करून घेतलाय. त्यामुळे कोरोनाचा आजार झाला की लोक बिथरून जातात. मात्र, आतापर्यंत जे रुग्ण मरण पावले त्यातील ३५ टक्के रुग्ण हे घाबरुनच मृत्यू पावले आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर आपले नातेवाईक आपल्याला इथे सोडून गेले. ते आपल्याला भेटायला येत नाही आणि डॉक्टर तसेच नर्स मंडळी आपल्याशी बोलत नाही, त्यामुळेच भीतीने अनेक रुग्णांनी मान टाकून दिली होती. त्यामुळे आतापर्यंत अशाप्रकारे ५ हजारांहून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत. परंतु कोरोनावर मात करत अनेक रुग्ण बरे होत घरी परतले आहेत.

बोरिवलीतील गोवर्धन नगरमधील इमारतीत राहणाऱ्या ८५ वर्षीय वसंत साळवी यांना घशात कफ सारखे जाणवू लागल्याने फॅमिली डॉक्टरकडे तपासून औषधे देण्यात आली. परंतु दोन दिवसांनी त्यांना ताप आल्याने त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर पाहिलं. त्यांना लगेच रुग्णालयात बेड उपलब्ध झाला नाही. त्यानंतर संध्याकाळी बेड उपलब्ध झाल्यानंतर बोरिवलीतील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये ११ जून रोजी दाखल केले. तेव्हापासून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. अधूनमधून ऑक्सिजन लावणे हे प्रकार सुरुच होते. परंतु यातील १५ दिवस तर ते ‘आयसीयू’त होते. पण त्यातूनही ते बरे होत १२ जूलै रोजी घरी परतले. तब्बल १ महिन्याच्या यशस्वी उपचारानंतर ते कोरोनावर मात करत ते घरी आले. रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स आणि वॉर्ड बॉय यांनी टाळ्या वाजवत रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज दिला.

वसंत साळवी यांनी याबाबत बोलतांना म्हणाले, जेव्हा मी या रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण म्हणून दाखल झालो तेव्हा थोडीफार भीती होतीच. पण येथील डॉक्टर संगोरे आणि त्यांच्या टीमने मला जे काही आत्मिक बळ दिले तेच मोठे होते. येथील प्रत्येक डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी स्वतः जातीने माझी चौकशी करायचे आणि मला धीर देतानाच माझे खाणे, गोळ्या औषध याच्याकडे जातीने लक्ष दिले. ज्यामुळे मला कुटूंबातील सदस्य भेटायला येत नसल्याने जो एकलपणा जाणवत होता, तो या डॉक्टर आणि त्यांच्या टीमने वारंवार संवाद साधून दूर केला. त्यामुळे हॉस्पिटलमधील सदस्य हा माझा कुटुंबातील सदस्यांसारखाच वाटत होता. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कार्यकर्त्या आणि महिला बचत गटाच्या आधारिका केंद्राच्या संचालिका रुची माने यांचे ते वडील आहेत. त्या सांगतात, जेव्हा त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली तेव्हा मी रुग्णालयात बेड राखीव ठेवण्यासाठी धावपळ सुरू केली होती. पण सुरुवातीला बेड उपलब्ध होण्यास वेळ लागला. पण त्याच दिवशी संध्याकाळी बेड रिकामी झाल्यावर त्यांना तिथे दाखल केले. पण आज १ महिना १ दिवस तिथे राहिल्यानंतर माझे वडील बरे होऊन घरी परतले यापेक्षा मला वेगळा आनंद काय असेल. एक महिन्याच्या कालावधीतील त्यांचे बिल केवळ तीन लाख रुपये आले. १५ दिवस आयसीयू असूनही त्यांचे बिल एवढे आले. एकाबाजूला काही रुग्णालय रुग्णांकडून पैसे उकळत असताना फिनिक्स हॉस्पिटलसारखी रुग्णालय ही सेवाभावी वृत्तीने उपचार करताना दिसतात. विशेष म्हणजे आपण आपला माणूस त्यांच्या हाती सोपवतो, तेव्हा त्यांनी त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. पण कोरोनात जेवढे रुग्ण दगावले, त्यामागेही डॉक्टर आणि त्यांच्या टीमने त्या रुग्णाला वैद्यकीय उपचाराबरोबरच आपुलकीने वागून त्यांचा धीर खचू न देणे हे महत्त्वाचे असते. नेमके तेच सूत्र या हॉस्पिटलने जपले. ज्यामुळे माझे बाबा रुग्णालयातून हसत हसत बाहेर पडले. त्यामुळे रुग्णालयात उपचाराबरोबर डॉक्टर आणि तेथील कर्मचारी वर्ग यांनी जर रुग्णांशी संवाद साधत त्यांना धीर दिला तर वयोवृध्द माणसेही बरी होऊ शकतात, हे माझ्या वडीलांच्या रूपाने फिनिक्स हॉस्पिटलने दाखवून दिल्याचे माने यांना वाटते.