मुंबईतील ललित हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; फोनवरून 5 कोटींच्या खंडणीची मागणी

A bomb threat call was received at a prominent lalit hotel in Mumbai

मुंबईतील प्रसिद्ध हॉटेल ललितला बॉम्बने उडवण्याची धमकी आलेली आहे. एका अज्ञात व्यक्तीने हॉटेलमध्ये फोन करून हॉटेलच्या चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे सांगितले आहे, तसेच ते बॉम्ब रिकामी निकामी करण्यासाठी 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. सोमवारी सायंकाळी 6.00 च्या सुमारास फोनवरून एका अज्ञात व्यक्तीकडून ही धमकी देण्यात आली. या धमकीनंतर हॉटेलबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.  तसेच हॉटेल परिसराची कसून तपासणी सुरु आहे.

धमकी देणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात आयपीसीच्या कलम 336, 507 नुसार सहार पीएस येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. या धमकीच्या फोननंतर आता पोलिसांनी तपासणी सुरु केली आहे. दरम्यान सायबर पोलिसांकडूनही तपासणी सुरु आहे. नेमका हा धमकीचा कॉल कोणी केला हे अद्याप समोर आलेले नाही, त्यामुळे फोन करणारी व्यक्ती कोण आहे? यामागे त्या व्यक्तीचा काय उद्देश आहे याच पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान धमकीनंतर अधिकाऱ्यांनी हॉटेल परिसराची झडती घेतली मात्र कुठेही बॉम्ब सापडले नाहीत.  त्यामुळे हा फेक कॉल असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अशात भारतात मोठा दहशतवादी हल्ला रोखण्यात काल रशियन सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. रशियातून एक दहशतवादी भारतातील भाजपच्या एका बड्या नेत्याला आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याने उडवून देण्याचा कट आखत होता, मात्र त्या आधीच रशियातून या दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने याबाबत माहिती दिली आहे. इस्लामिक स्टेटच्या या दहशवाद्याला रशियाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

अलीकडेच भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. रिलायन्स फाऊंडेशनचे हॉस्पीटल येथे फोनवर हा धमकीचा कॉल आला होता. अज्ञाताने 7ते 8 वेळा फोन केल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीनंतर रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलकडून डी.बी. मार्ग पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर दहिसरमधील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.