घरमुंबईनार्कोचे सत्य अंतिम सत्य नसते; आफताबचा गुन्हा सिद्ध करण्याचे पोलिसांपुढे आव्हान

नार्कोचे सत्य अंतिम सत्य नसते; आफताबचा गुन्हा सिद्ध करण्याचे पोलिसांपुढे आव्हान

Subscribe

गुन्ह्याची उकल करताना पोलीस वेगवेगळ्या अंगांनी तपास करीत असतात. पुरावा हाती लागत नसल्यास आरोपीला थर्ड डिग्रीही दिली जाते. सराईत गुन्हेगारांना त्याचाही फरक पडत नाही. अशा वेळी पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट केली जाते, मात्र या चाचण्यांमध्ये आरोपींनी दिलेला कबुली जबाब न्यायालयात पुरावा म्हणून वापरता येत नाही. त्याला सबळ पुरावे सादर करावे लागतात.

आरोपीने पोलीस कोठडीत दिलेली गुन्ह्याची कबुलीही न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. पोलिसांना सबळ पुरावे सादर करून गुन्हा सिद्ध करावा लागतो, अन्यथा आरोपीची सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाकडून सुटका होते.

- Advertisement -

दिल्ली येथे घडलेले श्रद्धा वालकर हत्या प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. आफताबने श्रद्धाची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात फेकले. प्राथमिक पोलीस तपासात ही बाब उघडकीस आली आहे. त्या आधारावर पोलीस तपास करीत आहेत.

आफताबला घटनास्थळी नेण्यात आले. श्रद्धाच्या अवयवयांचे शोधकार्य सुरू झाले, मात्र एवढ्या पुराव्यांनी आफताबला कठोर शिक्षा होणार नाही. त्यामुळेच पोलिसांनी आफताबची पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट केली. या चाचणीत आफताबने गुन्ह्याची कबुलीही दिली, मात्र ही कबुली न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांना सबळ पुरावे शोधावे लागतील. कारण या घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सध्या तरी पोलिसांकडे नाही. आफताबचा दोष सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची साखळी पोलिसांना तयार करावी लागेल.

- Advertisement -

कसाबचे पुरावे शोधावे लागले
२६/११ खटल्यात आरोपी अजमल कसाबचा गुन्हा सिद्ध करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. मुंबईवर हल्ला सुरू असताना पोलिसांनी कसाबला घटनास्थळी नेले आणि पुरावे गोळा केले. कसाबची नार्को टेस्ट केली. कसाबने गुन्ह्याची कबुली दिली होती, मात्र कबुलीला सिद्ध करणारे सबळ पुरावे न्यायालयात सादर झाले. त्यामुळेच कसाबला फाशीची शिक्षा होऊ शकली. अशा प्रकारे अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना पुराव्यांची साखळी उभी करावी लागते.

नार्को टेस्ट म्हणजे काय?
ही चाचणी आरोपींकडून सत्य जाणून घेण्यासाठी केली जाते. या चाचणीत आरोपीस काही औषधे दिली जातात, ज्यामुळे त्याचे जागृत मन सुस्त अवस्थेत जाते. ही चाचणी फॉरेन्सिक तज्ज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ आदींच्या उपस्थितीत केली जाते. काही प्रकरणांमध्ये आरोपी बेशुद्धावस्थेत जातो तेव्हा सत्य जाणून घेता येत नाही, परंतु नार्को टेस्टमध्ये आरोपी प्रत्येक वेळी सत्य सांगतात आणि प्रकरण सोडवले जाईल असे होत नाही.

पुराव्यांची साखळी आवश्यक

नार्को टेस्ट आरोपीच्या संमतीने केली जाते. यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. या चाचणीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असली तरी तो पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला जात नाही. तपासासाठी पोलिसांना याचा फायदा होतो. म्हणजे आफताबने चाचणीत सांगितले की, मी हत्यार अमूक एकाकडून घेतले, तर हत्यार देणार्‍याचा शोध घेण्यास पोलिसांना मदत होते. हत्यार देणार्‍याने जर सांगितले की, हो, मीच आफताबला हत्यार दिले, तर त्याच्या साक्षीच्या आधारे पोलीस पुराव्यांची साखळी उभी करू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -