घरमुंबईसद्धम्म पत्रिकेचे अंक म्हणजे बौद्ध धम्माचा इतिहास सांगणारे ताम्रपट, शिलालेख !

सद्धम्म पत्रिकेचे अंक म्हणजे बौद्ध धम्माचा इतिहास सांगणारे ताम्रपट, शिलालेख !

Subscribe

ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांचे गौरवोद्गार

प्राध्यापक आनंद देवडेकरांच्या सद्धम्म पत्रिका मासिकाचे अंक म्हणजे बौद्ध धम्माचा इतिहास सांगणारे ताम्रपट व शिलालेख ठरावेत अशा दर्जाचे आहेत. तथागत भगवान बुद्धांचा शिष्य असलेल्या भन्ते आनंदाची गुणवैशिष्ठ्ये मला आनंद देवडेकरांमध्ये दिसतात. त्यांचा सद्धम्म पत्रिकेच्या ऐतिहासिक कार्यासाठी सत्कार व्हायलाच हवा होता. असे उद्गार सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिका ‘आयदान’ कार उर्मिला पवार यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार भागवत बनसोडे होते. सद्धम्म पत्रिकेला वीस वर्षे झाल्याच्या निमित्ताने गठीत झालेल्या सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर सन्मान समितीने ठाणे पवार नगर येथील जेतवन बुद्ध विहारात आयोजित केलेल्या प्रा. देवडेकर यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात प्रमुख पाहुण्या म्हणून उर्मिला पवार बोलत होत्या.

या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे बोलताना मुंबईचे पोलीस उप आयुक्त डॉ. श्रीप्रकाश वाघमारे अभ्यासपूर्ण भाषणात म्हणाले की, दलित आत्मकथादी साहित्याने शौर्याची, निष्ठेची व प्रामाणिकपणाची परंपरा असलेल्या धर्मांतरीत बौद्ध समाजाला केवळ वैयक्तिक प्रसिद्धीसाठी आणि स्वार्थासाठी बदनाम केले आहे. अगदी विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविलेल्या बापाच्या मुलानेही त्यात कसर सोडलेली नाही. आपल्या भाषणात डॉ. वाघमारे पुढे म्हणाले की, दलित साहित्याने बदनाम केलेल्या बौद्ध समाजाच्या धम्म, संस्कृती, इतिहासाच्या गौरवशाली परंपरेची ओळख दर्जेदार अशा सद्धम्म पत्रिका मासिकातून करून देण्याचे ऐतिहासिक कार्य प्रा. आनंद देवडेकरांनी केले आहे.

- Advertisement -

सत्काराला उत्तर देताना प्रा. आनंद देवडेकर म्हणाले की माझ्या सारख्या सामान्य माणसाचा सन्मान करण्यासाठी समिती गठीत करून हा जो माझा गौरव केला आहे. त्यामुळे मला संकोचल्या सारखे होत आहे. मला शक्य झाले तेवढे मी माझे कर्तव्य म्हणून केले आहे. धम्मदीक्षेनंतर बौद्ध म्हणून डॉ. बाबासाहेबांनी सांगितलेल्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करून बौद्ध समाज बौद्ध धम्माशी संबंधित नसलेल्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील ब्राम्हणेतर चळवळीच्या मार्गाने चाललेला आहे. हा ब्राह्मणेतर चळवळीचा मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी केलेल्या धम्मक्रांतीसाठी धोकादायक आहे. म्हणून बौद्ध समाजात धम्म संस्कृतीनुरूप रीतीरिवाज रुजवण्यासाठी येथून पुढे जाणीवपूर्वक बौद्ध राष्ट्रातील समाजाचे दर्शन घडविणारे प्रबोधन व्हायला हवे, असे देवडेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी आनंद देवडेकर गौरव ग्रंथाचे प्रकाशनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्मान समितीचे सरचिटणीस प्रा. उत्तम भगत यांनी केले. बौद्ध प्रगती मंडळ ठाणेचे सचिव वसंतराव बनसोडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तर सन्मान पत्राचे वाचन प्रा. गिरीश साळवे यांनी केले. विविध क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित असलेल्या या सन्मान सोहळ्यासाठी औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर व रत्नागिरी भागातून सद्धम्मप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आभार प्रदर्शन कवी सुनील ओवाळ यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -