घरमुंबईपाण्यासाठी 'तिने' गमावला जीव !

पाण्यासाठी ‘तिने’ गमावला जीव !

Subscribe

उल्हासनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील सखल भागातील नागरिक पाणी खेचण्यासाठी विजेवर चालणाऱ्या मोटारीचा वापर करतात. बुधवारी सकाळी मोटार सुरू करताना विजेचा धक्का बसून एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
घरातील नळाला पाणी आल्यानंतर पाणी खेचण्याकरता निशा चिंतल (१२) हिने पाईपला मोटर जोडली असता विजेचा धक्का बसून तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ती कॅम्प नं. ३ येथील ओटी सेक्शन परिसरातील रेणूका सोसायटीमध्ये गल्ली नं. २ मध्ये घडली.
विजेचा धक्का बसल्यावर निशाला उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.

३५० कोटी गेले पाण्यात
महापालिका प्रशासनाने सुमारे ३५० कोटी रुपये खर्चून कोणार्क कंपनीला शहरात पाणी पुरवठा करण्याचा ठेका दिला. मात्र या कंपनीने प्रशासनाला मूर्ख बनवत पालिकेसाठी स्वतःचा पाणी पुरवठा निर्माण न करता केवळ एमआयडीसीकडून पाणी वळवण्याचे काम केले. त्यासाठी निळी पाईपलाईन टाकण्यात आली. उल्हासनगरातील रहिवाशांना आजही एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातच पाणी बिल थकल्याने एमआयडीसीने पाण्याच्या पुरवठ्याचा दाब कमी केला आहे. त्यामुळे सखल भागातील रहिवाशांना नळाचे पाणी खेचण्यासाठी नाईलाजाने मोटार लावावी लागत आहे.
पाण्याच्या प्रश्नावरून महापालिकेत अनेकदा राजकीय गदारोळ झाला आहे. मात्र, उल्हासनगरवासीयांना अद्यापही योग्य पाणीपुरवठा झालेला नाही. त्यातच काही नगरसेवक आणि राजकीय नेते वॉलमनला हाताशी धरून आपल्या भागातील पाणीपुरवठा बेकायदा पद्धतीने वळवून घेतात.
याबाबत पाणीपुरवठा विभाचे प्रमुख सेल्वन यांना सपर्क साधला असता, त्यांनी माझी उल्हासनगरमधून बदली झाली आहे. मी याबाबत काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. असे सांगितले.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -