Exclusive: निवारा वाचवण्यासाठी माकडाचे बंड

मेट्रोच्या मार्गातील झाडे तोडणार्‍या कर्मचार्‍यांवर जीवघेणा हल्ला

A monkey injured 132 people to save the house in andheri
Exclusive: निवारा वाचवण्यासाठी माकडाचे बंड

आपले घर आणि घरातील माणसे सुखी राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करतो. मग तो मानव असो किंवा प्राणी. आपल्या घरावर कोणी घाव घातला तर आपण पेटून उठतो, त्याचप्रमाणे प्राणीही बेभान होतात. याचाच प्रत्यय नुकताच अंधेरीत मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या ठिकाणच्या कर्मचारी व आसपासच्या रहिवाशांनी घेतला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या मार्गात येणारी झाडे तोडण्यासाठी मेट्रोच्या अधिकार्‍यांनी सुरुवात केली. मात्र या झाडांवर राहणार्‍या माकडाने आपला निवारा वाचवण्यासाठी थेट मेट्रोच्या कर्मचार्‍यांवरच हल्ला केला. १० ते १५ दिवस माकडाचा संघर्ष सुरु होता. मात्र, अखेर माकडाला पकडण्यात वनविभागाला यश आले.

अंधेरीमध्ये मेट्रो ३ प्रकल्पाची कामे वेगाने सुरु आहेत. या कामामध्ये येणारी झाडेही मोठ्या प्रमाणात तोडली जात आहेत. मात्र, ही वृक्षतोड करणे तेथील मेट्रोच्या अधिकार्‍यांसह रहिवाशांना चांगलेच महागात पडले आहे. अंधेरीतील चकाला याठिकाणी खोदकाम सुरु होते. त्याठिकाणची झाडे तोडण्यात आली. ही झाडे तोडल्यामुळे या झाडांवर वास्तव करणार्‍या चार माकडांचा निवाराही गेला. चकालापासून आरेचे जंगल जवळच असल्याने या माकडांची आरेच्या जंगलामध्ये ये-जा असायची. परंतु त्यांचे वास्तव्य असलेलीच झाडेच तोडल्याने माकडे संतप्त झाली. त्यामुळे या माकडांनी मेट्रोचे काम करणारे कर्मचारी आणि आसपासच्या रहिवाशांवर हल्ला सुरू केला. मेट्रोच्या साईटवरील २० ते २५ कामगारांनासह बिस्लरी कंपनीतील १० ते १२ जणांना माकडांनी जखमी केले. माकडे हैदोस घालत असल्याचे लक्षात येताच प्राणीमित्र, वनविभाग यांच्या मदतीने त्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली. चारपैकी तीन माकडांना पकडण्यात यश आले. मात्र त्यातील एक मोठे माकड हाती लागत नव्हते. तब्बल १५ दिवस शोध मोहीम राबवल्यानंतर १६ मार्चला दुपारी १ वाजता त्या माकडाला गुंगीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात आले. या १५ दिवसांत या माकडाने तब्बल ५० जणांना जखमी केले.

बोरिवली नॅशनल पार्कमधील प्राण्यांची देखरेख करणारे डॉ. शैलेश पेठे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे वन विभागाचे मुंबई रेंजचे संतोष कंक आणि राऊंड ऑफिसर नारायण माने, दत्ता रोडे यांच्या निदर्शनाखाली रेस्क्यू ऑपरेशन करत माकडाला पकडण्यात यश आले. माकडाची रवानगी ठाणे वनविभागाकडे करण्यात आली असून त्यानंतर या माकडाला बोरिवलीच्या नॅशनल पार्क येथे सोडण्यात येणार आहे, अशी माहिती प्राणीमित्र अतुल कांबळे यांनी दिली आहे.

जेसिबी चालवणार्‍यांवर करायचा हल्ला

वृक्षतोड करण्यासाठी वापरलेल्या पोकलेन चालकावर माकडाकडून वारंवार हल्ला करण्यात येत असे. पोकलेन चालवण्यासाठी प्रत्येक वेळी नवनवीन चालक बसवल्यानंतरही माकडाकडून पोकलेन चालकाला लक्ष्य केले जात असे.


हेही वाचा – पोलीस महासंचालक संजय पांडे नाराज, लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र