घरमुंबईपिंपळाच्या पानापासून बनवले टपाल पाकीट

पिंपळाच्या पानापासून बनवले टपाल पाकीट

Subscribe

गांधी जयंतीनिमित्त प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी टपाल विभागाचा अनोखा प्रयत्न

प्लास्टिकमुक्तीसाठी सार्‍या देशात विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यापार्श्वभूमीवर भारतीय टपाल विभागाने 150 व्या महात्मा गांधी जयंती निमित्त प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी चक्क पिंपळाच्या पानापासून अनोखे टपाल पाकिट बनवले आहे. हे पाकिट बनवताना निसर्गाची कोणतीही हानी होणार नाही हा उद्देश समोर ठेऊन हे पाकिट बनवण्यात आले आहे. पिंपळाच्या पानापासून भारतामध्ये असे टपाल पाकिट प्रथमच बनवण्यात आले आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी हे शाश्वत राहणीमान मानणारे व निसर्गप्रेमी होते. त्यामुळे त्यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी व प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्यासाठी भारतीय टपाल विभागाने पिंपळाच्या पानापासून अनोखे टपाल पाकिट बनवले आहे. झाडाची पाने सुकल्यानंतर ती गळतात. त्यामुळे ही पाने म्हणजे एकप्रकारे टाकाऊच ठरत असतात. गांधी जयंती व देशात सध्या सुरू असलेली प्लास्टिकविरोधी मोहीम या दोन्हीचा संगम साधता यावा या उद्देशाने गांधींजीचे निसर्गप्रेम लक्षात घेऊन आम्ही झाडांच्या पानांपासून टपाल पाकिट बनवण्याचा निर्णय घेतला. यामध्येही पिंपळाचे पान हे सुकल्यानंतरही टिकून राहत असल्याने पिंपळाच्या पानाचा वापर करण्यात आल्याचे टपाल विभागाने घेतला.

- Advertisement -

मुंबई विभागाचे पोस्टमास्तर जनरल स्वाती पांडे यांच्या संकल्पनेतून हे अनोखे पाकिट साकारण्यात आले. हे पाकिट बनवण्याची जबाबदारी कोलकातामधील टपाल विभागाकडे सोपवण्यात आली होती. पांडे यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांनी हे पाकिट उत्तमरित्या बनवले आहे. पिंपळाच्या पानापासून बनवण्यात आलेले या पाकिटाचा पुनर्वापरही करता येणार आहे. पिंपळाच्या पाकिटापासून बनवलेल्या या अनोख्या पाकिटाचे अनावरण 6 नोव्हेंबरला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपळापासून बनवलेल्या या पाकिटाची किंमत 500 रुपये इतकी आहे. पहिल्या टप्प्यात 150 पाकिटे बनवण्यात आली असून, अनावरण होताच सर्वच पाकिटांची विक्री झाली आहे. दुसर्‍या टप्प्यामध्ये 300 पाकिटे बनवण्यात येणार असल्याची माहिती टपाल खात्यातील अधिकार्‍यांनी दिली.

पूर्णत: पिंपळाच्या पानापासून बनवलेले पाकिट हा एक अनोखे संशोेधन आहे. झाडांची सुकलेली पाने नेहमीच वाया जातात. त्यापासून काही टिकाऊ बनवले पाहिजे या विचाराने गांधीजींच्या 150 व्या जयंतीनिमित्त हे पाकिट बनवण्यात आले आहे. या पाकिटातून तुम्ही पाठवलेले कोणतेही पत्र समोरच्या व्यक्तीला नक्कीच मिळणार आणि पाकिट पाहून त्याला आनंदही होईल. – स्वाती पांडे, पोस्टमास्तर जनरल, मुंबई विभाग

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -