घरमुंबईमहिलेच्या पोटातून काढला ५ किलो वजनाचा ४५ गाठींचा ट्यूमर

महिलेच्या पोटातून काढला ५ किलो वजनाचा ४५ गाठींचा ट्यूमर

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाबरोबरच अन्य रुग्णालयांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेच्या पतीने जे.जे. रुग्णालयात धाव घेतली. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी या महिलेच्या पोटातून पाच किलो वजनाचा तब्बल ४५ गाठी असलेला ट्यूमर बाहेर काढत तिला जीवदान दिले आहे.

कोरोनाचे संक्रमण आटोक्यात असले तरी अद्यापही अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार करण्याची टाळाटाळ केली जात आहे. भिवंडीतील एका महिलेच्या पोटामध्ये १३ वर्षांपासून वाढत असलेल्या ट्यूमरमुळे कोरोनामध्ये प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाबरोबरच अन्य रुग्णालयांनी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला. त्यामुळे महिलेच्या पतीने जे.जे. रुग्णालयात धाव घेतली. जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी या महिलेच्या पोटातून पाच किलो वजनाचा तब्बल ४५ गाठी असलेला ट्यूमर बाहेर काढत तिला जीवदान दिले आहे.

महिलांमधील हार्मोन्समध्ये बदल झाल्यावर किंवा अनुवांशिकपणे त्यांच्या गर्भाशयामध्ये फायब्रॉईडचा ट्यूमर निर्माण होण्याची शक्यता असते. भिवंडीमध्ये राहणार्‍या शमा नौशाद अन्सारी (वय ४३) ही २००७ मध्ये गर्भवती असताना तिच्या सोनोग्राफी अहवालामध्ये गर्भाशयात फायब्रॉईडच्या गाठी दिसून आल्या. पोटातील बाळाबरोबरच गाठीही वाढू लागल्या. शमाची प्रसूती सुरळीत झाल्यावर गाठी काढण्याबाबत तिचे पती नौशाद अन्सारी यांनी डॉक्टरांकडे विचारणा केली. त्यावर शमा यांची मासिक पाळी बंद झाल्यावर गाठी काढण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अन्सारी यांनी पुढील उपचार सुरू ठेवले, मात्र शमाच्या पोटातील वेदना कायम होत्या. तब्बल १३ वर्षे शमा हा त्रास सहन करत होत्या. फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांना प्रचंड त्रास होऊ लागल्याने त्यांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी त्यांना ३० एप्रिलला शस्त्रक्रिया करू असे सांगत २८ एप्रिलला दाखल होण्यास सांगितले. मात्र त्यापूर्वीच लॉकडाऊन झाले, अशाही परिस्थितीत अन्सारी यांनी स्वत:च्या जीवाची परवा न करता पोटातील वेदनेसह शमाला २८ एप्रिलला मोटरसायकलवरून भिवंडीहून ठाण्याला आणले. कोरोनाच्या परिस्थितीमुळे उपस्थित डॉक्टरांनी सध्या शस्त्रक्रिया बंद असल्याचे सांगत त्यांना दाखल करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी अनेक रुग्णालयांमध्ये धाव घेतली. मात्र कोणीच शस्त्रक्रियेची तयारी दर्शवली नाही. काही दिवसांनी अन्सारी यांनी पुन्हा ठाणे रुग्णालय गाठले. त्यावेळीही त्यांना डॉक्टर उपलब्ध नसून मुंबईतील केईएम, सायन किंवा जे.जे. रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अन्सारी यांनी शमाला घेऊन जे.जे. रुग्णालय गाठले.

- Advertisement -

शमा जे.जे. रुग्णालयात आल्यानंतर स्त्रीरोगशास्त्र प्रसूती विभागाच्या प्रमुख व प्राध्यापक डॉ. राजश्री कटके यांनी तातडीने त्यांची सोनोग्राफी, कोविड व अन्य चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये शमाच्या पोटामध्ये भला मोठा ट्यूमर असल्याचे आढळले. प्रथमदर्शनी हा ट्यूमर कर्करोगाचा वाटल्याने त्यांनी शमाचे सीटी स्कॅन केले. त्यानंतर तो ट्यूमर फायब्रॉईडच्या गाठींचा असल्याचे स्पष्ट झाले. ट्यूमर हृदयापर्यंत पोहोचला होता, तसेच मूत्राशयाच्या नळ्या आणि पोटातील आतडी ५० टक्के दबली होती. शस्त्रक्रिया करण्यास विलंब झाल्यास मूत्राशय, आतड्यांना मोठी इजा होऊन जीवावर बेतण्याची शक्यता होती. शस्त्रक्रियेचे गांभीर्य लक्षात घेता डॉ. राजश्री कटके यांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. किचकट व अवघड असलेल्या या शस्त्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त जाण्याची शक्यता असते. मात्र डॉ. राजश्री कटके व त्यांच्या सहकार्‍यांनी शमाच्या मूत्राशयाच्या नळीमध्ये तारा टाकून फ्रोजन सेक्शन पद्धतीचा वापर करत यशस्वी शस्त्रक्रिया केली. तब्बल सहा तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये शरीरातून रक्त न घालवता तब्बल पाच किलो वजनाचा ट्यूमर काढला. त्यामध्ये तब्बल लहान-मोठ्या ४५ फायब्रॉईडच्या गाठी होत्या. या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर शमाला एक नवीन जीवन मिळाले आहे.

शमाच्या पोटातील ट्यूमर हा तिच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. पण यापूर्वी अशा अनेक किचकट शस्त्रक्रिया केल्याचा अनुभव गाठीशी होता. त्यामुळेच ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे करू शकले. ही शस्त्रक्रिया करण्यासाठी माझे सहकारी डॉक्टर, परिचारिका यांची मोलाची साथ लाभली. या शस्त्रक्रियेमुळे शमाचे कुटुंबीय आनंदी झाले. हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
– डॉ. राजश्री कटके, विभाग प्रमुख, स्त्रीरोग शास्त्र प्रसुती विभाग, जे.जे. रुग्णालय

 

कोरोनामध्ये आमच्या स्त्रीरोगशास्त्र प्रसूती विभागाच्या डॉक्टरांनी अवघड व किचकट अशी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली. यामुळे महिलेला जीवदान मिळाले आहे. ही आमच्या रुग्णालयासाठी चांगली व अभिमानास्पद बाब आहे.
डॉ. रणजित माणकेश्वर, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय
कोविडच्या काळामध्ये माझ्या पत्नीला घेऊन मी रुग्णालयांमध्ये विचारणा करत होतो. पण कोणीच शस्त्रक्रिया करण्यासाठी तयार होत नव्हते. जे.जे. रुग्णालयात मी आल्यावर डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने तिची यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली. १३ वर्षांपासून पत्नीला होत असलेल्या त्रासातून तिची सुटका केली. ही शस्त्रक्रिया सोपी नव्हती. पण डॉक्टरांनी कमाल करत माझ्या पत्नीला जीवदान दिले आहे. आता ती खूश आहे.
– नौशाद अन्सारी, शमाचे पती
Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -