IPLमध्ये कर्जबाजरी झालेल्या तरुणाने उघडला बनावट नोटांचा छापखाना

क्रिकेट बेटींगमध्ये झालेले कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटा छापून मार्केटमध्ये पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या बी-फार्मासिस्ट झालेल्या तरुणाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातील दौड येथून अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळून प्रिंटिंग मशीन, संगणक संच, शंभर रुपयांच्या बनावट नोटा आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

दीपक मोहन गुंगे असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. दीपक मूळचा पंढरपूर येथील एका खेड्यात राहणारा आहे. वडील शेतकरी असून दिपकने बी-फार्मा केले आहे. मागील काही वर्षांपासून दिपकला क्रिकेट बेटींग चा नाद लागला होता. २०१७ च्या आयपीएल मध्ये क्रिकेट बेटींगच्या लाखो रुपये हारल्यामुळे तो कर्जबाजारी झाला होता. सावकाराकडून त्याने तब्बल १२ ते १५ लाख रुपये कर्ज घेतले होते. सावकाराकडून कर्जाचा तगादा मागे लागल्यामुळे त्याने वर्षभरापूर्वी पुणे जिल्हयातील दौड येथे एका निर्जन ठिकाणी असलेल्या अर्धवट बांधकामाच्या ठिकाणी एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. या फ्लॅटमध्ये तो बनावट नोटा छापण्याचा प्रयोग सुरू केला होता. वर्षभरानंतर त्याच्या हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याने केवळ शंभर रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान, एक जण बनावट नोटा मुंबईतील बाजारात विक्री करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ३ चे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळाली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त नंदकुमार ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ३ प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, नितीन पाटील, सपोनी भारते आणि पथक यांनी लोअर परळ, सीताराम मिल कंपाउंड येथे सापळा रचून एकाला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील बॅग तपासली. त्यात पोलिसांना शंभर रुपयांच्या ८९६ नोटांचा बंडल मिळून आल्या. पोलिसांनी नोटा तपासल्या असता त्या बनावट असल्याचे समोर आले. पोलिसांनी तताब्यात घेतलेल्या दीपक गुंगे याला अटक करून चौकशी केली असता त्याने कर्ज बाजारी झाल्यामुळे बनावट नोटा छापून बाजारात वितरित करण्यासाठी घेऊन आला होता, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली असल्याचे प्रभारी पोलीस अधिकारी अशोक खोत यांनी दिली.

हेही वाचा –

‘योगींनी त्यांचं राज्य सांभाळावं’, गृहमंत्री अनिल देशमुखांनी टोचले कान!