घरमुंबईकोस्टल रोड, बोर्ड वॉक प्रकल्पाच्या आराखड्याबाबत पालकमंत्री आदित्य ठाकरेंकडून आढावा

कोस्टल रोड, बोर्ड वॉक प्रकल्पाच्या आराखड्याबाबत पालकमंत्री आदित्य ठाकरेंकडून आढावा

Subscribe

वांद्रे किल्ला आणि माहीम किल्ला या दोन ठिकाणांना जोडणारा बोर्ड वॉक कम सायकल ट्रॅक मुंबईतील नवीन आकर्षण ठरेल.

मुंबई महापालिकेमार्फत मुंबईत सुरु असलेल्या कोस्टल रोडच्या (सागरी किनारा मार्ग) कामाचा आज राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. या मार्गाच्या मान्सूनपूर्व कामाच्या तयारीचीही ठाकरे यांनी माहिती घेतली. पावसाळ्यातही ही कामे नियोजनबद्ध व सुरळीतपणे चालू राहण्याच्या अनुषंगाने कोस्टल रोड टीम, तसेच मुंबई महापालिकेच्या सी, डी आणि जी – दक्षिण वॉर्डच्या सहायक आयुक्तांना यावेळी निर्देश देण्यात आले. ऑनलाईन झालेल्या या बैठकीत कोस्टल रोड प्रकल्‍पाची प्रगती व मान्‍सूनपूर्व कामांचा आढावा याबाबत सादरीकरण करण्यात आले.

मान्‍सूनपूर्व कामे करण्‍यात येत असून पावसाळ्यात पाण्‍याचा निचरा होण्‍यासाठी पातमुखे (Outfall), खुला नाला (Open Channel) व पंपींगच्‍या माध्‍यमातून कोठेही पाणी साठणार नाही याची दक्षता घेण्‍यात आली आहे. तसेच २४x७ नियंत्रण कक्ष पावसाळ्यात कार्यान्वित करण्‍यात येईल, अशी माहिती यावेळी आदित्य ठाकरे यांना देण्यात आली. कामाची प्रगती राखण्‍यासाठी कामगार व इतर साधनसामुग्री यांचे योग्‍य ते नियोजन करण्‍याचे निर्देश ठाकरे यांनी दिले.

- Advertisement -

बोर्ड वॉक प्रकल्पाच्या आराखड्याबाबत आढावा 

तसेच मुंबईतील वांद्रे किल्ला आणि माहीम किल्ला या दोन ठिकाणांना जोडणारा प्रस्तावित बोर्ड वॉक कम सायकल ट्रॅक प्रकल्पाच्या आराखड्याबाबतही आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. हा बोर्ड वॉक कम सायकल ट्रॅक मुंबईतील नवीन आकर्षण ठरेल. बृहन्मुंबई महानगरपालिकेला हा प्रकल्प पूर्णत्वास नेताना सर्व संबंधीत यंत्रणांनी योग्य ते सहकार्य करावे, असे निर्देश आदित्य ठाकरे यांनी आज संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना दिले.

या प्रस्तावित प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने आदित्य ठाकरे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमीत सैनी, महानगरपालिकेच्या जी / उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर सहभागी झाले होते.

- Advertisement -

प्राथमिक संकल्पनेनुसार हा प्रकल्प सुमारे ४.७७ किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामध्ये पादचारी मार्गिका आणि सायकल ट्रॅक या दोन्ही बाबी समाविष्ट असतील. स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठी देखील हा प्रकल्प आकर्षणाचा भाग ठरेल. प्रस्तावित बोर्ड वॉकसाठी अंतिम आराखडा आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -