मुंबई : सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर 10 महिन्यांपूर्वी बांधलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्टला कोसळला होता. पुतळा दुर्घटनेप्रकरणी प्रमुख आरोपी शिल्पकार जयदीप आपटे आणि त्याचा सहकारी चेतन पाटील यांना अटक करण्यात आली आहे. मागील सुनावणीवेळी जयदीप आपटेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तर, चेतन पाटीलचा जामीन नाकारला होता. मात्र आता चेतन पाटीलला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. (Accused Chetan Patil granted bail in Chhatrapati Shivaji Maharaj statue tragedy case)
नौदल दिनाचे निमित्त साधून 4 डिसेंबर 2023 रोजी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्याला वर्ष होण्यापूर्वीच 26 ऑगस्टला हा पुतळा पडला होता. या दुर्घटनेप्रकरणी दोन शिल्पकार आणि आर्टिसरी कंपनीचा मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट डॉ. चेतन पाटील यांच्यावर निष्काळजीपणा व कामाचा निकृष्ट दर्जा, तसेच पुतळ्याच्या आसपासच्या लोकांचे संभाव्य नुकसान झाल्याचा आरोप ठेवत एफआयआर दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होताच दोघेही फरार झाले होते.
हेही वाचा – Politics : मुंडेंकडून देशमुख पिता-पुत्रावर कारवाईची मागणी; राजेसाहेब देशमुखांकडून स्पष्टीकरण
पुतळा दुर्घटनेप्रकरणी चेतन पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातून अटक करण्यात आली होती. यानंतर दोन आठवड्यापासून फरार असलेल्या जयदीप आपटेला कल्याणमधील त्याच्या घरातून अटक झाली. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने दोघांचाही जामीन फेटाळला होता. त्यामुळे चेतन पाटील आणि जयदीप आपटे यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी आज सुनावणी पार पडली.
न्यायमूर्ती ए एस किलोर यांच्या खंडपीठाने सांगितले की, चेतन पाटील याची पुतळ्याचे स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून नियुक्ती न केल्यामुळे त्यांना या प्रकरणात गोवण्याचे कोणतेही कारण नाही. कारण चेतन पाटील याने केवळ पुतळ्याच्या खाली बनवलेल्या कठड्याचा संरचनात्मक स्थिरता अहवाल सादर केला होता आणि पुतळा पडल्यानंतरही तो कठडा शाबूत होता, असे म्हणत चेतन पाटील याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. चेतन पाटील याला 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी जयदीप आपटेच्या जामीन याचिकेवर येत्या 25 नोव्हेंबरला सुनावणी होईल, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाने दिली.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : लोकल सुरूच… कोणताही व्यत्यय न आणता रेल्वे कर्मचाऱ्यांचे मतदान