मुंबई : दादर रेल्वे स्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळते. परंतु, हे स्थानक महिलांसाठी असुरक्षित आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला. सोमवारी (06 जानेवारी) भरदिवसा एका माथेफिरूने महाविद्यालयीन तरुणीचे केस कापल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मनोरुग्ण नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले, पण त्याने तरुणीचे केस कापण्याचे अजब कारण सांगितले आहे. (Accused told strange reason for cutting young woman hair at Dadar station)
सोमवारी सकाळी कल्याण येथे राहणारी तरुणी माटुंगा येथील महाविद्यालयात जाण्यासाठी दादर रेल्वे स्थानकात उतरली. साधारणतः सकाळी 9.15 वाजताच्या सुमारास ही तरुणी दादर स्थानकावर उतरल्यानंतर ती दादरच्या मेन ब्रीजवर आली. यानंतर तिकीट बुकिंग करतात त्या खिडकीजवळ पोहोचली असताना तिला मागच्या बाजूला अचानक काहीतरी काटेरी टोचल्यासारेखे जाणवले. त्यामुळे तिने मागे वळून पाहिले असता, एक व्यक्ती बॅग घेऊन घाईघाईत पुढे जाताना दिसला. तरुणीने खाली पाहिले असता, तिला केस पडलेले दिसले. त्यामुळे तिने स्वतःच्या केसांवर हात फिरवला असता, तिला तिचे केस मध्येच कापल्याचे आढळले. या प्रकाराने तरुणी घाबरली, पण तिने हिंमत करत माथेफिरुचा पाठलाग केला. मात्र गर्दीचा फायदा घेत विकृत मनःस्थिती असलेल्या व्यक्तीने तिथून पळ काढला.
तरुणीने तत्काळ दादर येथील रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) विभागाला तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर आरपीएफने सीसीटीव्ही कॅमेरे तपासत तक्रार नोंद करून घेतली. त्यानंतर मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांकडे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 79 अंतर्गत गुन्हे दाखल करत आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यानंतर रेल्वे पोलिसांनी घटना घडलेल्या ठिकाणी मंगळवारी (7 जानेवारी) सापळा रचून आरोपीला अटक केली.
आरोपीने सांगितले अजब कारण
दरम्यान, पोलिसांनी सांगितले की, दिनेश गायकवाड (35) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो एका खासगी कंपनी काम करत असून मनोरुग्ण नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. आरोपीला तरुणीचे केस कापण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता. त्याने सांगितले की, त्याला महिलांचे लांब केस आवडत नाहीत. त्यामुळे त्याने तरुणीचे केस कापले. धक्कादायक म्हणजे याआधीही ऑगस्ट 2024 मध्ये आरोपीने एका 40 वर्षीय महिलेचे केस कापले होते. त्यामुळे आरोपीने आतापर्यंत किती महिलांबरोबर असा प्रकार केला आहे? यचा तपास आता पोलीस करत आहेत.
हेही वाचा – Mumbai Crime News : अंगडियावर गोळीबार करून बॅग लुटणारे असे सापडले पोलिसांच्या जाळ्यात