मुंबई – कुर्ला येथे 9 डिसेंबर रोजी भीषण बस दुर्घटना घडून 9 जणांचा मृत्यू झाला. 40 वाहनांचे नुकसान झाले तर 40 जण जखमी झाले. या दुर्घटनेच्या 11 दिवसानंतर महापालिकेला कुर्ला येथे ज्या स.गो.बर्वे मार्गावर दुर्घटना घडली होती, त्या रस्त्यावरील अतिक्रमणाची प्रकर्षाने जाणीव झाली. त्यावर आज महापालिकेने कारवाई करून सदर अतिक्रमण हटविले आहे.
त्यामुळे पादचाऱ्यांसाठी रस्ता, पदपथ मोकळे झाले तर बस आणि इतर वाहनांना सदर रस्त्यावरून वाहतूक करणे सुलभ झाले. यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने, ‘एल ‘विभाग कार्यालयामार्फत आज स.गो. बर्वे मार्ग तसेच कुर्ला रेल्वेस्थानक मार्ग येथील 25 दुकानांसमोर पदपथांवर उभारलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली.
तसेच, दुकानांसमोरील पदपथावर करण्यात आलेले अनधिकृत लादी बांधकाम, अनधिकृत शेड त्याचप्रमाणे लाकडी बाकडे, दुकानाबाहेर लटकवलेले साहित्य यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. पालिकेच्या या कारवाईने अतिक्रमण करणारे दुकानदार, फेरीवाले हे चांगलेच हादरले आहेत. मात्र पालिकेने बस दुर्घटना घडली आणि त्यामध्ये मोठी जीवित, वित्तीय हानी झाली म्हणून फक्त एका दिवसासाठी कारवाई न करता सातत्याने कारवाई करावी, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
वास्तविक, बेस्टच्या बस चालकाच्या एका चुकीमुळे सदर दुर्घटना घडून जीवित हानी झाली आणि वाहनांचे नुकसान झाले. ही वस्तुस्थिती असताना महापालिकेने त्या घटनेच्या निमित्ताने दुकानदार, फेरीवाले यांना नाहक टार्गेट करू नये. उगाच आमच्यावर कारवाईचा बडगा उगारून आमचे आर्थिक नुकसान करू नये, अशी कुजबूज दुकानदार, फेरीवाले यांच्यात ऐकायला मिळाली.
तर, दुसरीकडे नागरिकांनी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवायाबाबत समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा : Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरण; तीन दिवसानंतर धनंजय मुंडे आले समोर
Edited by – Unmesh Khandale