घरताज्या घडामोडीBREAKING : अभिनेते इरफान खान यांचं निधन

BREAKING : अभिनेते इरफान खान यांचं निधन

Subscribe

दोनच दिवसांपूर्वी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेले अभिनेते इर्फान खान यांचं वयाच्या ५४व्या वर्षी निधन झालं आहे. २०११मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांचा गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा सुरू होता. त्याचसाठी त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच २५ एप्रिल रोजी त्यांच्या आईचं देखील निधन झालं होतं. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून त्यांचं अंतिम दर्शन घेतलं होतं. मात्र, आता खुद्द इरफान खान यांच्याच निधनाच्या वृत्तामुळे चित्रपट सृष्टीवर दु:खाची शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे एक अष्टपैलू अभिनेता हरपल्याची भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे.

- Advertisement -

‘अंग्रेजी मीडियम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. त्यांच्या हिंदी मीडियम या चित्रपटाचा तो सिक्वेल होता. त्यांच्या मकबूल, पीकू, द लंच बॉक्स, हिंदी मीडियम अशा अनेक चित्रपटांमधून त्यांच्या अभिनयाची छाप त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीवर सोडली होती. मूळचे जयपूरचे असलेले इरफान खान यांनी दिल्लीच्या एनएसडी अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर चित्रपटसृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रगल करून आपलं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पान सिंह तोमर या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. २०१८मध्ये त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यानंतर काही महिने उपचार केल्यानंतर त्यांनी कमबॅक देखील केलं होतं. त्यानंतर त्यांनी अंग्रेजी मीडियम हा चित्रपट देखील केला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत आज दुपारी मालवली. त्यांच्या निधनानंतर चित्रपट सृष्टीसोबतच इतर क्षेत्रातल्या मान्यवरांनी देखील शोक व्यक्त केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -