सुशांतवर अंत्यसंस्कार

sushant singh rajput
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत

हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दर्जेेदार अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा, पण अनपेक्षितरित्या केलेल्या आत्महत्येमुळे अनेकांना हादरवून टाकणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी मुंबईतील विलेपार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि सिनेक्षेत्रातील मोजकेच मान्यवर कलाकार उपस्थित होते.

सुशांतचे पार्थिव कूपर हॉस्पिटलमधून सोमवारी दुपारी ४ वाजता अंत्यविधीसाठी पार्ल्यातील स्मशानभूमीत आणण्यात आले. बिहारमधील पाटणा येथून सुशांतचे वडील सोमवारी दुपारी मुंबईत दाखल झाले. सुशांतने वांद्रे येथील ज्या घरात आत्महत्या केली तिथे ते गेले. त्यांनतर कूपर हॉस्पिलटमध्ये आले. सुशांतचे वडील, दोन बहिणी, अभिनेत्री श्रद्धा कपूर, गायक उदित नारायण यांच्यासह काही मित्र परिवार स्मशानभूमीत त्याच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना स्मशानभूमीत जाण्याची परवानगी होती. पार्ल्यातील सेवा समाज स्मशानभूमीत सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या ३४ व्या वर्षी सुशांतने नैराश्यातून हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. सुशांतने आत्महत्या केली त्यावेळी त्याचे काही मित्र घरातच होते. पोलीस या घटनेचा सखोल तपास करत असून त्याच्या मित्रांची तसेच सिनेक्षेत्रातील काही लोकांची चौकशी केली जात आहे.