मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचे पुनर्वसन आणि त्यासाठी झालेली प्रसिद्ध उद्योगपती अदाणी यांची निवड हा राज्याच्या राजकारणातील चर्चेचा मुद्दा आहे. यावरून विरोधक महाविकास आघाडी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी राज्यातील महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कायमच टीका करत असतात. मात्र, आता ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार असं काही बोलून गेले की, यामुळे विरोधकांच्या आरोपातील हवाच निघून गेली आहे. (adani group was not interested in dharavi project initially says sharad pawer amid rahul gandhi uddhav thackeray row)
धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने काही ना काही टीका करत आहेत. अशातच महाविकास आघाडीचे प्रणेते आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्याच या दोन नेत्यांच्या विधानाशी फारकत दर्शवली आहे. यावरूनच आता भाजप आयटी सेलचे अध्यक्ष अमित मालवीय यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा – Vinod Tawde : पैशाचे सर्व आरोप खोटे, त्याबाबत एकही गुन्हा दाखल नाही; काय म्हणाले विनोद तावडे?
धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून कॉंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट अदानी समूहाला लक्ष्य करत आहे. मात्र, महाविकास आघाडीचा आणखी एक घटक पक्ष राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मात्र, याच्याशी सहमत नाहीत. जेव्हा धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पासाठी बैठक झाली, तेव्हा अदाणी समुहाला त्यात काहीही रस नव्हता. त्यांच्यासोबत यासंदर्भात काही चर्चा देखील झाली नव्हती. एका डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. दरम्यान, ठाकरे आणि गांधी यांनी आजपर्यंत अदाणींवर कितीही टीका केली असली तरी शरद पवार मात्र त्यांच्यावर टीका करताना कधीही दिसले नाहीत.
धारावी हा मुद्दाच नाही. अदाणी समूहाला निशाणा बनवलं जात असल्याची प्रतिक्रिया पवारांनीच दिली आहे. धारावी पुनर्वसनासाठी जेव्हा बैठक झाली होती, तेव्हा त्यात गौतम अदाणी यांचा काहीही सहभाग नव्हता. उलट, हा प्रकल्प दुसऱ्याच कंपनीला देण्यात आला होता. या प्रकल्पासंदर्भात चर्चा झाल्या पण त्या अदाणी समूहासोबत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.
भाजपाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी शरद पवार यांच्या या विधानाचा आधार घेत त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. मालवीय म्हणतात, अदाणी संदर्भात ठाकरे आणि गांधी करत असलेली विधाने आता शरद पवारांनीच फेटाळली आहेत. आणि त्याहीपेक्षा धारावी पुनर्वसन प्रकल्पात अदाणींना रसही नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मालवीय म्हणतात, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या केवळ एक दिवस आधी मविआतील घटक पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याकडून अशी प्रतिक्रिया येणे हे लाजिरवाणे आहे. मुंबईकरांची दिशाभूल करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी सातत्याने प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
हेही वाचा – Maharashtra Assembly 2024 : अखेर विनोद तावडेंविरोधात गुन्हा दाखल; 9 लाखांची रोकड जप्त
यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर दिले होते. धारावीमध्ये 2 लाख जणांना घरं मिळणार आहेत. 2 लाख लोकांचं आयुष्य बदलणार आहे. ते कचऱ्यात, घाणीत राहातात. त्यांचं आयुष्य अतिशय हालाखीचं आहे. धारावीकरांना न्याय द्यायचा असेल तर राहुल गांधींनी संपूर्ण माहिती घ्यावी. यापूर्वी काय झालं होतं, ते समजून घ्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. सरकारमधून पायउतार झाल्यानंतरच विरोध का करता, असा सवालही मुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला होता.
Edited by : Ashwini A. Bhatavdekar