मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात २४ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका साठा

water storage

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गेल्या काही दिवसांत चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे तलावांतील पाणी साठ्यात काहीशी वाढ झाली आहे. सध्या सात तलावांत १,८६,९७३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा आहे. हा पाणीसाठा पुढील ५३ दिवस पुरेल इतका म्हणजे २४ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका आहे. मात्र पावसाळा संपल्यावर मुंबईकरांसाठी तलावांत पुढील वर्षभरासाठी १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असणे आवश्यक असते.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात सरासरी ७० टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत तलावांत २४ जून रोजी १,४१,३८७ दशलक्ष लिटर इतका कमी पाणीसाठा शिल्लक होता. तसेच, तलावांत अपेक्षित पाऊस न पडल्याने अखेर पालिकेने २७ जूनपासून दररोजच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

मुंबई महापालिकेतर्फे ठाणे, भिवंडी महापालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जात असल्याने या महापालिकांनाही १० टक्के कपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दररोज ३,८५० ऐवजी ३,४६५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जात आहे. सध्याचा शिल्लक पाणीसाठयाचे गणित केल्यास हा पाणीसाठा पुढील २४ ऑगस्टपर्यन्त पुरेल इतका आहे.

३ जुलै रोजी सकाळी ६ पर्यंत सात तलावात पडलेला पाऊस व जमा पाणीसाठा –

तलाव         तलावांत पडलेला पाऊस (मिमी)  पाणीसाठा दशलक्ष लि. 

उच्च वैतरणा     १९७.००                               ०

मोडकसागर    ३११.००                              ४७,४२१

तानसा          ३८९ .००                             १२,६१२

मध्य वैतरणा   ३२७ .००                              १८,७९०

भातसा         ४५०. ००                              ९९,३४९

विहार         ६४७.००                               ५,९९५

तुळशी       ८९०.००                                 २,८०३

एकूण       ३,२११. ००                     एकूण   १,८६,९७३