CoronaVirus: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘आधारीका’चा आधार

कांदिवली,बोरीवलीतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आधारीका महिला बचन गटातील महिलांनी आधार दिला आहे. महापालिका कामगार, वाहतूक पोलिसांसह रेल्वे पोलिसांच्या जेवणाचा भार त्यांनी उचलला आहे.

adhareeka trust distribute food to police, srp and traffic police in borivali
CoronaVirus: अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना 'आधारीका'चा आधार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने आणि हॉटेल्स बंद ठेवण्यात आल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कामगारांची जेवणाचे हाल प्रारंभाच्या दिवसांपासून होत असत. त्याची दखल घेत कांदिवली आणि बोरीवलीतील अत्यावश्यक सेवेतील या कामगारांच्या जेवणासह नाश्त्याची जबाबदारी महिला बचत गटांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या आधारीका केंद्राने उचलली आहे. त्यामुळे महापालिकेचे कामगार, वाहतूक पोलिस आणि रेल्वे व एसआरपी जवानांना आधारीकाच आधार ठरत आहे.

३०० ते ३५० कामागारांना सकाळाचा नाश्ता आणि दुपारचे जेवण

लॉकडाऊनमुळे कांदिवली आणि बोरिवली येथील महापालिकेच्या आर-दक्षिण आणि आर-मध्य विभागातील सफाई कामगार, सुरक्षा रक्षकांसह विभागातील अत्यावश्यक सेवेतील कामगार, कर्मचारी वर्गाच्या नाश्त्याची जबाबदारी सध्या कांदिवली महावीर नगर येथील आधारीका केंद्राने उचलली आहे. त्यामुळे दरदिवशी महापालिकेच्या आर-दक्षिण आणि आर-मध्य विभागातील सुमारे ३०० ते ३५० कामगारांच्या सकाळचा नाश्ता, तसेच दुपारचे जेवण पुरवले जाते. सकाळी नाश्त्याला पोहे, उपमा, वडा उसळ आदी प्रकारच्या खाद्यपदार्थाचा समावेश असतो, तर जेवणामध्ये विविध प्रकारची सर्व भाज्यांचा वापर करत खिचडी पुरवली जात असल्याची माहिती आधारीकाच्या संचालिका रुची माने यांनी दिली आहे.

जेवण बनवणाऱ्यांची केली जाते आरोग्य तपासणी

महापालिका कर्मचाऱ्याव्यतिरिक्त कांदिवली, बोरीवलीमधील वाहतूक पोलिस आणि बोरिवली रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तसेच एसआरपी जवान आदींनाही येथून जेवण पाठवले जाते. १०० वाहतूक पोलिस आणि २००हून अधिक जवान आदींना आधारीकामधून जेवण पुरवले जाते. याठिकाणी सक्षम आरोग्य असलेल्या तसेच त्यांच्या आरोग्याची योग्य तपासणी करून दहा जणांचा चमू तयार केला आहे. त्यांच्या मदतीला तीन पुरुष आहे. त्यांच्या मदतीने दरदिवशी नाश्ता आणि जेवण बनवले जाते. याठिकाणाहून पोलिस आणि अत्यावश्यक सेवेतील कामगारांना जेवण पाठवले जात असल्यामुळे जेवण बनवणाऱ्यांचे पहिले आरोग्य तपासून घेतले असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

सुरुवातील मास्क बनवण्याचा उपक्रम

या आधारीकामध्ये महिला बचत गट तसेच मुलींना तसेच इतर महिलांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देत त्याप्रमाणे उपक्रम राबवले जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील महिलांच्या मदतीने सुरुवातील मास्क बनवण्याचा उपक्रम राबवला. या मास्कपैकी काही मास्क मोफतमध्ये पोलिसांना वितरीत केले, तर काही मास्कची विक्री केली. यातून प्राप्त झालेला निधी तसेच खासदार गोपाळ शेट्टी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्राप्त झालेल्या आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तुंमुळे जेवण पुरवण्याचे काम महिला समर्थपणे पार पाडत असल्याचेही माने यांचे म्हणणे आहे. दोनच दिवसांपूर्वी भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमानिमित्त कांदिवलीत आलेल्या भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी या आधारीका केंद्राला भेट देऊन तेथे बनवण्यात येणाऱ्या जेवणाी तसेच अन्नदानाची माहिती जाणून घेतली होती.


हेही वाचा – CoronaVirus – मुंबईतील ‘या’ चार विभागात कोरोना रुग्णांची संख्या चाळीसच्या वर!