मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या प्रचाराचा झंजावात मुंबईत सुरू आहे. आज दहिसर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनोद घोसाळकर, मागाठाणे मतदारसघांचे उमेदवार उदेश पाटेकर आणि गोरेगाव मतदारसंघाचे समीर देसाई यांच्या प्रचारार्थ आज जाहीर सभा घेतल्या यावेळी या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणा असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. तसेच भाजपाचे नेते म्हणत आहेत, कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ है, तर मी त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहे, असे मोठे वक्तव्य त्यांनी केले. (Aditya Thackeray agrees with the slogan Katenge to Batenge and Ek Hai to Seif)
आपल्या भाषणात आदित्य ठाकरे म्हणाले की, अदाणींचं अजून एक भूत आपल्या डोक्यावर म्हणजे मुंबईतल्या कोळीवाड्यांवर बसवलं जात आहे. कोळी बांधवांसाठी डीसीपीआरमध्ये नियम वगळायला पाहिजेत. कोळीवाड्यातले प्रश्न वेगळे आहेत, पण आपल्या जिल्ह्यातले कोळीवाडे या सरकारला बिल्डरच्या घशात घालायचे आहेत. सब भूमी गोपाल की असं म्हणतात, तसं भाजपवाले बोलतात सब भूमी अदानी की. इथले खासदार पियूष गोयल मच्छी मार्केटमधून जाताना वास आल्यावर तोंडाला रुमाल लावतात. त्यांना कोळी बंधवांशी काही देणं घेणं नाही. मात्र मी इथल्या कोळीवाड्यांच्या विकासासाठी लढणार आहे. इथले कोळी बांधव प्रॉपर्टी कार्ड मागत आहेत, त्यामुळे त्यांच्या नावावर मी प्रॉपर्टी कार्ड करून देणार, असा दावा त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : पवारांनी जितेंद्र आव्हाडांना मुख्यमंत्री केले तरी…; ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट
कटेंगे तो बटेंगे या वक्तव्याशी मी सहमत
दरम्यान, भाजपावर निशाणा साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकार बहुमतात असतानाही भाजापा म्हणते, हिंदू खतरे में है. असं बोलण्यापेक्षा भाजपा सत्तेत नसलेली बरी. भाजपाचे नेते म्हणत आहेत, कटेंगे तो बटेंगे आणि एक है तो सेफ है, तर मी त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहे. कारण भाजपा आपला कधीही खिसा कापेल. त्यामुळे आपल्याला एक राहायला हवं. भाजपा या ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद घडवण्याचा प्रयत्न करत आहे. कुठल्या मंदिराचं काम अपूर्ण असताना आपण त्याचं उद्घाटन करतो? असे केलं तर त्याला पाप समजतात. त्यामुळे प्रभू श्रीराम जिथे जिथे गेले होते, त्या ठिकाणी भाजपाचा पराभव झाला आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : काँग्रेस उमेदवाराचा प्रचार नागरिकांच्या जीवावर; 9 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी