दुर्गम भागातील गावांना मुख्य रस्त्याने जोडणार

पालघर जिल्हा दौर्‍यात आदित्य ठाकरेंचे आश्वासन

aaditya thackeray

पालघर जिल्ह्यातील काही भाग दुर्गम क्षेत्रात येतो. अशा भागात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. यामध्ये रस्ते व आवश्यक असेल तेथे पूल बांधणे गरजेचे असल्यामुळे त्या भागात या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यातील दुर्गम भाग मुख्य रस्त्याशी जोडण्यात येणार असल्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

वैतरणा नदीवरील सावर्डे ते दापोरा गावांना जोडणार्‍या लोखंडी पुलाचे लोकार्पण रविवारी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

पालघर जिल्ह्यातील बराचसा भाग हा दुर्गम असल्यामुळे दळणवळणाचा मुख्य स्रोत रस्ते व पूल येथे उपलब्ध झाले नाहीत, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार अशा दुर्गम भागांना मुख्य रस्त्याने जोडले जाणार आहे. यामुळे या भागातील शेतकरी बांधव व स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी शहापूर तालुक्यातील माळ, बिवळवाडी, गोलभण या ठिकाणी भेट दिली आणि स्वागताचा कार्यक्रम नको असे सांगत जमिनीवर खाली बसून महिला भगिनींशी थेट संवाद साधला. शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव – पाड्यांसाठी दोन वर्षात भावली पाणी योजना होईल. पण त्याआधी आपल्या डोक्यावरचा हंडा खाली कसा उतरेल आपल्या घरापर्यंत पाणी कसे येईल हे पाहण्यासाठी मी आलो असल्याचे आदित्य यांनी यावेली म्हटले. बिवळवाडी येथे पाणीपुरवठ्यासाठी टोपाचीबावडी या विहिरीत टँकरद्वारे पाणी टाकल्यानंतर सोलरपंपने टेकडीवरील गावात पाणी पोहोचविण्यात येईल. तसेच विजेची समस्या सोडविण्यात येईल असे स्पष्ट केले. याशिवाय वनतलाव, जलकुंभ, बंधारे,विहिरी बांधून पाणीटंचाई दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

यावेळी कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, आमदार सुनील भुसारा, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिंह, कार्यकारी अभियंता माधवराव शंखपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.