घरमुंबईआदित्य ठाकरे मुंबईचे महापौर?

आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर?

Subscribe

मुंबई महापालिकेच्या कामकाजात सध्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे चांगलेच स्वारस्य दाखवत आहेत. आयुक्तांना भेटून विकास कामे करून घेण्याकडे त्यांचा कल सुरु आहे. तसेच महापालिका संबंधित कामकाज देखील ते पाहत आहेत. त्यामुळे ते महापौर आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिकेच्या कामकाजात सध्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे चांगलेच स्वारस्य दाखवत आहेत. आयुक्तांना भेटून विकास कामे करून घेण्याकडे त्यांचा कल सुरु आहे. एका बाजुला आदित्य ठाकरे हे विधानसभेची निवडणूक लढवणार का याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात असताना दुसरीकडे महापालिकेतील वावर वाढत चालला आहे. त्यातच मंगळवारी महापालिका मुख्य आपत्कालिन नियंत्रण कक्षात मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेण्यात आलेल्या आदित्य ठाकरे यांनी मालाड येथील भिंत दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये महापालिकेच्यावतीने देण्यात येणार असल्याची घोषणा आदित्यने केली. एवढेच नाही तर जखमींवर महापालिकेच्यावतीने मोफत उपचार केला जाईल, असेही जाहीर केले. मात्र, महापालिकेच्यावतीने अधिकृत याची घोषणा नसताना आदित्यने ही घोषणा केल्यामुळे आदित्य ठाकरे हे मुंबईचे महापौर आहेत का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

आदित्य ठाकरेंसाठी महापौरांनी मोडला राजशिष्टाचार 

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेचा महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेते तसेच विविध समित्यांचे अध्यक्ष आहेत. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर प्रविणसिंह परदेशी यांनी आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार टि्वटर हँडल अपडेट करत त्यात सुधारणा केली होती. त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार २४ विभाग कार्यालयांच्या तक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र ट्विटर हँडल तयार करण्यात  आले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी आदित्य  ठाकरेंनी शिक्षण विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचा आढावा घेवून महापालिका आयुक्तांना सूचना केल्या होत्या. एवढेच नव्हेतर काही दिवसांपूर्वी मिठी नदीच्या सुशोभिकरणासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यासह आदित्यने माहिती घेतली. महापौरांसह होणाऱ्या बैठकीत खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर उशिरा उपस्थित राहिले. परंतु त्यांची वाट न पाहता आदित्य ठाकरे आणि रामदास कदम यांनी आयुक्तांसोबत बैठक घेतली. महापौरांनीही त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासाठी राजशिष्टाचार मोडून आयुक्तांच्या दालनात बैठकीला उपस्थित राहिले होते.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांचे सध्या महापालिकेत आयुक्तांशी चर्चा आणि बैठका वारंवार होत असून काही वेळा महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांना कल्पना न देता आदित्य आयुक्तांना भेटून जातात. त्यानंतर बऱ्याच वेळा बैठकीतील चर्चेची माहिती टि्वटरवरून देतात. परंतु मंगळवारी आदित्य ठाकरे हे महापालिका मुख्यालयातील मुख्य आपत्कालिन नियंत्रण कक्षात पालकमंत्री सुभाष देसाई आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह पोहोचले. विशेष म्हणजे सकाळी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मुख्य आपत्कालिन नियंत्रण कक्षात हजेरी लावली होती. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेल्यामुळे स्वत:ची लाज वाटल्याने सत्ताधारी पक्षाची ही मंडळी नियंत्रण कक्षात पोहोचली.

आदित्य ठाकरे करतात महापालिके संदर्भात घोषणा 

मात्र, सोमवारी मध्यरात्री मालाड पिंपरीपाडा येथील झोपड्यांवर संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा महापालिकेच्यावतीने अधिकृतपणे करण्यात आली नव्हती. परंतु ही घोषणा महापौरांकडून किंवा आयुक्तांकडून होणे अपेक्षित असताना, माध्यमांसमोर आदित्य ठाकरे यांनी जाहीर केली. मृतांच्या नातेवाईकांना महापालिकेच्यावतीने ५ लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आदित्य ठाकरे हे एका राजकीय पक्षाचे नेते आहेत. पण महापालिकेशी त्यांच्या काहीही संबंध नसताना त्यांना अशाप्रकारची घोषणा करण्याचे अधिकार काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisement -

आजवर अशाप्रकारच्या दुर्घटना झाल्यानंतर महापालिकेने कधीही पाच लाख रुपयांची घोषणा केलेली नाही. नगरसेवकांकडून सभागृहात मागणी केल्यानंतर काही प्रमाणात आर्थिक मदत जाहीर केली जाते. झाड दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा ठराव महापालिकेत मंजूर झाला. तरीही आजही पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे पाच लाख रुपयांची मदत दिली गेलेली नाही. त्यामुळे आदित्यने,  मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली म्हणून आदित्यने पाच लाख रुपये महापालिकेच्यावतीने देण्याची घोषणा केली का? असा सवाल उपस्थित होत आहे. आदित्य ठाकरे यांचा महापालिकेतील स्वारस्य आणि वाढलेला वावर हाचमुळी महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांवर असलेला अविश्वास असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे महापालिकेच्या घोषणा या आदित्य ठाकरेंनी महापौरांना करायला लावल्या, तर त्या अधिक योग्य ठरू शकतील. परंतु आदित्यने आधी महापालिकेचे कामकाज समजून घेताना महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांचे तसेच आपले अधिकार काय आहेत हे समजून घेणे योग्य ठरेल. आदित्य ठाकरे हे पक्षाचे नेते असले तरी महापालिकेचे नेते नाहीत. त्यामुळे त्यांना पक्षाच्यावतीने ज्या सूचना करायच्या आहेत, त्या महापालिकेतील नेत्यांना कराव्यात आणि त्यांनतर त्यांनी या सुचनांच्या अंमलबजावणीचे काम केले आहे की नाही याची पाहणी करावी. परंतु आदित्य ठाकरे सध्या एकहाती शिवसेना चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे नेतेही आता आदित्य बाबा की जय म्हणतच आपली पदे आणि खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.


हेही वाचा – आदित्य ठाकरेंसाठी महापौरांनी मोडला प्रोटोकॉल!

हेही वाचा – काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात?


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -