महापालिकेचा अर्थसंकल्प सादर कोण करणार आणि मंजूर कोण करणार?; आदित्य ठाकरेंचा सवाल

मुख्यमंत्री स्वतः राजीनामा देऊन निवडणुका घेण्यास तयार नाहीत. निवडणुका न घेता काही जण दुसऱ्या बाजुला जातात. तरीही सरकार चालु आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. हे अयोग्य आहे. त्यामुळे निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. 

 

मुंबईः महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर होणार आहे. मात्र पालिकेत लोकप्रतिनिधीच नाहीत. असे असताना अर्थसंकल्प सादर कोण करणार व मंजूर कोण करणार, असा सवाल ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी केला.

ते म्हणाले, आता जवळपास एक वर्ष होईल पालिकेचा कारभार लोकप्रतिनिधीविना सुरु आहे. असे असताना उद्या अर्थसंकल्प सादर होणार आहे. हा अर्थसंकल्प सादर कोण करणार व मंजूर कोण करणार. त्यामुळे त्यात नक्कीच घोटाळ होईल. मी रस्त्यांच्या कामाचा घोटाळा बाहेर काढला आहे. त्याप्रमाणे यामध्येही घोटाळा होईल. आमची सत्ता येणारच आहे. सत्ता आल्यानंतर आम्ही याची नक्कीच चौकशी करणार आहोत.

दादर, शिवाजी पार्क येथे माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही टीका केली. ते म्हणाले, शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे मुंबई व अन्य पालिकेच्या निवडणुका घेण्यास काहीच हरकत नाही. कोरोनाचे संकटही आता नाही. तरीही निवडणुका का होत नाहीत? ४० गद्दार आमदार व गद्दार खासदारांच्या निवडणुका का घेतल्या जात नाही?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्री स्वतः राजीनामा देऊन निवडणुका घेण्यास तयार नाहीत. निवडणुका न घेता काही जण दुसऱ्या बाजुला जातात. तरीही सरकार सुरु आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे. हे अयोग्य आहे. त्यामुळे निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी मागणी आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. जनता महाविकास आघाडीच्या पाठिशी आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचाच विजय होईल, असा विश्वास आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही कौतुक केले. ते म्हणाले, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण विभागात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोकणात बाळाराम पाटील यांच्यासारखा चांगला उमेदवार पराभूत झाला. त्याची कारणे जगजाहीर आहेत. प्रचंड धनशक्तीपुढे सरळमार्गी बाळाराम पाटील यांचा निभाव लागला नाही. परंतु लोकांच्या मनात बाळाराम पाटीलच आहेत. याबद्दल माझ्या मनात शंका नाही असेही जयंत पाटील यांनी सांगितले.