रोज टीका करणं हे भाजपचं काम; मुंबई पालिकेवरील फडणवीसांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गेल्या दोन आठवड्यांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. दरम्यान आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी फडणवीसांनी मुंबईच्या स्थायी समितीच्या अध्यक्षांपासून ते पालिकेच्या अनेक योजनांवर टीका केली. या टीकेवर आता राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “भाजपची सवयचं झाली आहे की रोज उठून कोणावर ना कोणावर टीका करावी. आज महाविकास आघाडी सरकारने मुंबईकरांसाठी घरांसंदर्भात ज्या घोषणा केल्या त्यामुळे पोट दुखी झाली असेल, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईकरांचे घरांचे विषय होते, घरांसाठीची एक पॉलिसी होती, या सगळ्या गोष्टी मुंबईकरांच्या मनातल्या होत्या त्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आहेत. ही मुंबईसाठी मोठी गोष्ट असून मुंबईसाठी हा दिलासा आहे. मुंबईसाठी पहिल्यांदा एवढं चांगल काही होत असेल तर त्याचं आपण अभिनंदन केलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आज महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे.

फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “भाजपची सवयचं झाली आहे की रोज उठून कोणावर ना कोणावर टीका करावी. आज महाविकास आघाडी सरकारने मुंबईकरांसाठी घरांसंदर्भात ज्या घोषणा केल्या त्यामुळे पोट दुखी झाली असेल. त्यातून मनातून जे शब्द बाहेर येतात ते शब्द आले”

“राज्य सरकारने कोविडमध्ये काहीच न करता केवळ भष्ट्राचार केला या भाजपच्या टीकेवर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, हे हास्यास्पद आहे. कारण आपण सर्व साक्ष आहात की, नुसतं स्वत: कौतुक करायचं म्हणून आम्हीच काही बोललो नाही. पण आम्ही काम करत राहिलो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटना, सुप्रीम कोर्ट, पंतप्रधान मोदींनी त्यावेळी फोन करून कौतुक केले, जगभरातून जेव्हा कौतुक होत होते तेव्हा कौतुकासाठी नाही पण कर्तव्य म्हणून आम्ही काम करत राहिलो. तेव्हा देखील विरोधी पक्ष राजकारण करत होते. त्यावेळी देखील आम्ही राजकारणाकडे लक्ष न देता काम करत राहिलो” असही आदित्य ठाकरे म्हणाले.

धारावी पॅटर्न, महाराष्ट्र मॉडेल हे जगभरात प्रसिद्ध झाले त्यावर आता टीका टिप्पणी करणं हे विरोधी पक्षांचे कर्तव्य आहे म्हणून ते करत राहतील, असे देखील आदित्य ठाकरे म्हणाले.


Corona Update : राज्यात आज कोरोनाचे 139 नवे रुग्ण; 3 रुग्णांचा मृत्यू