“फालतू आरोपांना मी उत्तर देत नाही”; देशपांडेंच्या हल्ल्यावरुन आदित्य ठाकरेंचे मनसेला प्रत्युत्तर

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज (ता. ३ मार्च)सकाळी काही अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. हा हल्ला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्या सांगण्यावरून करण्यात आला आहे, असा आरोप मनसेचे नेते अमेय खोपकर यांच्याकडून करण्यात आला आहे, याबाबत आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Aditya Thackeray's reply to MNS on Sandeep Deshpande's attack

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज (ता. ३ मार्च) सकाळी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे काही अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. यामध्ये संदीप देशपांडे यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. देशपांडे हे शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. यानंतर त्यांना तात्काळ हिंदुजा रुग्नालयात दाखल करण्यात आले. परंतु संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आणि युवानेते आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनसे नेते अमेय खोपकर यांनी केली आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी देशपांडे यांच्या हल्ल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मनसेला प्रत्युत्तर दिले आहे. विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, अशा फालतू आरोपांना मी उत्तर देत नाही. रोज सकाळी उठल्यावर आदित्य ठाकरेला शिवी द्या आणि फेमस व्हा. ही स्कीम सुरु झालेली आहे. मला शिवी देऊन आणि त्या पक्षाला कळलं पाहिजे. तो पक्ष असेल की भाजपची टी टीम असेल, त्यांना कळलं पाहिजे की, उद्धव साहेबांची ऍक्टिंग करून किंवा मला शिव्या घालून पक्ष वाढत नाही. त्यापेक्षा कामाला लागा आणि लोकांची सेवा करा,” असा टोला मनसेला लगावला आहे.

हेही वाचा – Breaking: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर क्रिकेटच्या स्टम्पने जीवघेणा हल्ला, रुग्णालयात दाखल

दरम्यान, याआधी अनेकदा आदित्य ठाकरे यांनी मनसेला “टाईमपास टोळी” असे म्हंटले आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे यांनी मनसेचा ‘टी टीम’ केलेला उल्लेख म्हणजेच टाईमपास टोळी असा त्याचा अर्थ होतो, अशी चर्चा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांनी अनेकदा मनसेला भाजपची ‘बी टीम’ देखील म्हंटले आहे.