फडणवीसांशी आजही चांगले संबंध; आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर ठाकरे गटाकडून यासाठी भाजपला जबाबदार ठरविण्यात येत आहे. पण ठाकरे गटाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना वेग आला आहे.

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून दोन दिवसांपूर्वी जोरदार धक्का देण्यात आला. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे ठाकते गटात एकच खळबळ माजली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत खुल्या जीपमधून शिंदे गट अंडी भाजपवर निशाणा साधला. तर शिंदेंच्या मागे भाजप नावाची महाशक्ती आहे असे ठाकरे गटाचे खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे. पण आता आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

एका कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांना काही प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये फडणवीसांबाबत सुद्धा प्रश्न विचारण्यात आला यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. आमच्या मनात कुठलीही कटुता नाही, माझ मनं साफ आहे. आमच्या घरात असंच वातावरण आहे. आमच्यावर अनेक जणांनी अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, मात्र आम्ही तशा प्रकारची टीका कधीच केलेली नाही. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे संबंध कसे होते, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही पर्सनली काही घेत नाही.” असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी एक गुगली टाकली.

तर “आम्ही त्यांना मित्र मानतो, पण ते आम्हाला काय मानतात, त्यांच्या मनात काय चाललं आहे, हे आम्हाला माहित नाही,”असे म्हणत आदित्य यांनी फडणवीसांना टोला देखील लगावला. पण आदित्य ठाकरे यांनी अचानक टाकलेल्या गुगलीमुळे गुगलीमुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा केल्या जात आहेत. एकीकडे भाजपकडून राजकीय खेळीद करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे, असे वक्तव्य वारंवार करण्यात येत असतानाच आदित्य ठाकरे यांना नेमके काय बोलायचे आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्री मध्यरात्री दोन वाजता पोहोचले कसब्यात; काय आहे कारण?

याशिवाय यावेळी आदित्य ठाकरेंना त्यांच्या लग्नाविषयी देखील विचारण्यात आले. तुम्ही लग्न कधी करताय? असा प्रश्न विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘हा प्रयत्न तुम्ही चार वर्षांपूर्वीसुद्धा केला होतात, आणि आताही करताय. सध्या फक्त राजकारणावर लक्ष केंद्रित करू.’