घरमुंबईगँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपाईन्समध्ये अटक

गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपाईन्समध्ये अटक

Subscribe

गँगस्टर सुरेश पुजारीला फिलिपाईन्समध्ये अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि डिपार्टमेंट ऑफ ज्यूरिडिक्शन यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत प्रेयसीसोबत लपून बसलेल्या सुरेश पुजारीला अटक करण्यात आली आहे. सुरेश पुजारी याच्या अटकेबाबत मुंबई पोलिसांकडून अद्याप दुजोरा देण्यात आलेला नाही.

सुरेश पुजारी हा गँगस्टर २००७ मध्ये भारताबाहेर आपल्या प्रेयसीला घेऊन निसटला होता. परदेशात राहणारा सुरेश पुजारी याला २०२० मध्ये फिलिपाईन्स मध्ये प्रेयसीसोबत दडून बसल्याची माहिती मुंबई पोलिसांना यापूर्वीच गुप्त माहितीदाराने दिली होती. मात्र, त्याचा नेमका ठावठिकाणा मिळून येत नव्हता.

- Advertisement -

अमेरिकेच्या एफबीआय आणि डिपार्टमेंट ऑफ ज्यूरिडिक्शन यांनी नुकतीच केलेल्या कारवाईत सुरेश पुजारी याला फिलिपाईन्समधून अटक केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याबाबत मात्र मुंबई पोलिसांकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. सुरेश पुजारी याच्यावर एकट्या मुंबईत १६ गंभीर गुन्ह्यांची नोंद असून मुंबई पोलिसांनी १५ पेक्षा अधिक सुरेश पुजारी टोळीच्या गुंडांना अटक केली आहे.

ठाणे पोलीस आयुक्त यांच्या हद्दीत देखील पुजारी याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून काही महिन्यांपूर्वी त्याने उल्हासनगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला धमकावल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सुरेश पुजारी हा परदेशात बसून आंतरराष्ट्रीय कॉलमार्फत मुंबई सह ठाण्यातील बडे व्यापारी, बिल्डर, व्यावसायिक यांना खंडणीसाठी धमकावत असे. सुरेश पुजारी स्वतः साधा फोन वापरत होता व बँक व्यवहारासाठी स्मार्ट फोनचा वापर करीत होता. सीबीआयने त्याला रेड कॉर्नर नोटीस देखील बजावली होती. सुरेश पुजारी याला भारतात आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisement -

सुरेश पुजारी हा गँगस्टर रवी पुजारीसाठी पूर्वी काम करत होता. त्यानंतर त्याने स्वत:ची गँग स्थापन केली. त्याच्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केल्यावर तो आपल्या प्रेयसीसह भारताबाहेर निसटला. सुरेश पुजारी गँग ही हॉटेल आणि बार मालकांकडून हप्ता वसूल करायची. मुंबई पोलीस आता सुरेश पुजारीच्या हस्तांतरणाबाबत सक्रिय होणार असल्याचे समजते. फिलिपाईन्सला जाण्यापूर्वी सुरेश पुजारी हा अनेक देशांमध्ये नाव आणि आपली ओळख लपवून राहत होता. अखेर फिलिपाईन्समध्ये त्यांच्या विशेष पोलीस पथकाने सुरेश पुजारीला अटक केली. गँगस्टर रवी पुजारी हा देखील मुंबई पोलिसांच्या ताब्यात असून त्याला सेनेगल येथून ताब्यात घेण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -