घरमुंबई१२ वर्षांनी सिद्धार्थ नगरवासीयांनी वीजबिले भरली

१२ वर्षांनी सिद्धार्थ नगरवासीयांनी वीजबिले भरली

Subscribe

वीजबिल थकबाकीच्या एक तपाचा अस्त

घरातील विजेच्या जोडणीसाठीचे बिल भरण्यासाठी विलंब होताच तत्काळ वीज पुरवठा खंडित होतो हा सर्वसामान्य वीज ग्राहकांचा अनुभव असतो. पण तब्बल १२ वर्षे सलग वीजबिल न भरण्याचा विक्रम केलाय तो चेंबूरच्या सिद्धार्थ नगरवासीयांनी. तब्बल एक तप पूर्ण केल्यानंतर अखेर गेल्या सप्टेंबर महिन्यातील वीजबिल संपूर्ण सिद्धार्थ नगरमधील २३५० रहिवाशांनी भरले आहे. जवळपास १२ वर्षे वीजबिल न भरल्याने ही थकबाकी ७५ कोटींवर पोहचली आहे.

सिद्धार्थ नगरमध्ये २३५० वीज ग्राहकांपैकी बहुतांश वीज ग्राहक हे घरगुती वीज जोडणी घेतलेले ग्राहक आहेत. काही छोट्या दुकान चालवणार्‍या वाणिज्यिक ग्राहकांचा तसेच पीठ गिरण्यांचाही समावेश यामध्ये होतो. जून महिन्यापासून अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडकडून सुरू झालेल्या पाठपुराव्यामुळे आणि कडक भूमिकेच्या बडग्यामुळेच यंदाच्या सप्टेंबरमध्ये १०० टक्के वीज ग्राहकांनी चालू वीज बिल भरले आहे. जोपर्यंत सर्व वीज ग्राहक वीजबिल भरणार नाहीत तोपर्यंत अखंडीत वीज पुरवठा देण्यात येणार नाही, असा पवित्रा एईएमएलने घेतल्यानेच सप्टेंबरचे वीजबिल २३५० वीज ग्राहकांनी मुदतपूर्व भरले आहे. सरासरी ६० लाख इतके वीजबिल सिद्धार्थ नगरवासीयांना पाठवण्यात येते. पण गेल्या १२ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व वीज ग्राहकांनी वीजबिल भरले आहे.

- Advertisement -

सिद्धार्थ नगरमध्ये संमिश्र अशा स्वरूपाचे वीज वापरकर्ते आहेत. अगदी घरातल्या नुसत्या बल्ब आणि पंख्यापासून ते एअऱ कंडीश्नर वापरणारे वीज ग्राहकही सिद्धार्थ नगरमध्ये आहेत. पण गेली अनेक वर्षे आपण वापरत असलेल्या वीजेचे बिल भरायची सवयच या ग्राहकांना नव्हती. पण गेल्या काही महिन्यांमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यासाठीच्या नोटीसा तसेच सकाळ -संध्याकाळ खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे सिद्धार्थ नगर वासीय मेटाकुटीला आले होते. विजेसारख्या महत्वाच्या गरजेपासून वंचित रहावे लागत असल्यानेच काहीजणांनी वीज बिल भरण्यासाठीची सुरूवात केली. पण काही जण वीजबिल भरत नव्हते, त्यामुळे पहाटे, सायंकाळी असा वीज पुरवठा काही तास खंडित होत होता. पण अधिकाधिक वीजबिल भरणार्‍या ग्राहकांनी थकबाकीदार ग्राहकांवरील दबाव वाढवला. त्याचाच परिणाम हा सप्टेंबरमध्ये १०० टक्के वीज ग्राहकांनी वीजबिल भरले आहे. वीजबिल न भरणार्‍या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल ही तंबी दिल्यामुळेच आता १०० टक्के वीज ग्राहक वीजबिल भरू लागले आहेत.

12 वर्षांनी झाली मीटर रिडिंग
रिलायन्स एनर्जी ते एईएमएल असा वीज कंपनीचा कारभार मुंबई उपनगरात बदलला. तरीही सिद्धार्थ नगरमध्ये प्रवेश करून वीज मीटरचे रिडिंग घेण्याची हिंमत या दोन्ही कंपन्यांकडून होत नव्हती. पण वीज पुरवठा दिवसा काही काळासाठी बंद करण्याची शिस्त जेव्हापासून लागली तेव्हापासून एईएमएलला बर्‍याच वीज यंत्रणेशी संबंधित गोष्टी सुरळीत झाल्या. सुरूवातीला काही वीज ग्राहकांनी वीज बिल भरण्याची तयारी दाखवली. त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी याचा धसका घेतला. थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित होणार या भितीने आणखी काही लोकांनी वीज बिल भरण्यासाठी तयारी दाखवली. परिणामी मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक बिल भरत असल्याने एईएमएलच्या कर्मचारी वर्गालाही मीटर रिडिंगसाठीचा प्रवेश मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -