अर्थसंकल्पानंतर मविआची अंबादास दानवेंच्या निवासस्थानी खलबतं

mahavikas aghadi long march against shinde fadanvis govt on 17 december ajit pawar criticize maharashtra govt

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. असे असले तरी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्याची टीका विरोधकांनी केली. तसेच राज्य सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होणार का, याबाबत विरोधकांना शंका असून अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता विरोधक चांगलेच कामाला लागले आहेत. विधिमंडळाचे आजचे कामकाज संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या गोटात मोठ्या घडामोडी घडायला सुरुवात झाली असून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता अंबादास दावने यांच्या ‘अजिंक्यतारा’ या निवसास्थानी खलबतं होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजपाला पछाडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून वारंवार बैठकांचे सत्र सुरु आहे. विधिमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात महाविकास आघाडीची काल नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांसोबत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीनंतर महाविकास आघाडी एप्रिल-मे महिन्यामध्ये जाहीर सभा होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची आज देखील बैठक अंबादास दानवेंच्या निवासस्थानी सुरू आहे.

राज्यात महापालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. याशिवाय पुढच्यावर्षी विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी सरकार स्थापन करण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडी भाजप विरोधात मोर्चे बांधणी करणार आङे. त्याचीच ही सुरुवात असल्याची चर्चा आहे.

महाविकास आघाडी एप्रिल-मे महिन्यात राज्यतील मुख्य शहरांमध्ये संयुक्त जाहीर सभा घेणार आहे. या सभांमध्ये उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार राज्याच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. याच सभांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. या सभांचे नियोजनाचे काम सुरु झाले आहे. या सभांच्या नियोजनासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरु आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी महाविकास आघाडीचा येत्या 15 मार्चला देखील मेळावा होणार आहे.