घरमुंबईविजयानंतरही युतीच्या गोटात चिंतेचे मळभ

विजयानंतरही युतीच्या गोटात चिंतेचे मळभ

Subscribe

यंदा लोकसभा निवडणूकीतील युती भाजप-शिवसेनेच्या पथ्यावर पडली आहे. मात्र याच वर्षी होवू घातलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी युती करताना दोन्ही पक्षांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

यश मिळविणे जितके सोपे, तितकेच ते टिकविणे अवघड असते. देशभरातील नमो लाटेवर स्वार होत ठाणे जिल्ह्यातही शिवसेना-भाजप युतीने निर्विवाद यश मिळविले आहे. मात्र काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत हेच यश टिकविण्याचे मोठे आव्हान दोन्ही पक्षांच्या नेत्यांसमोर आहे.

२०१४ च्या लोकसभेनंतर काडीमोड घेत या दोन्ही पक्षांनी पुढील सर्व निवडणुका स्वतंत्रपणे लढल्या. राज्यात आणि केंद्रात युती असली तरी शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये कायम ‘तू तू – मै मै’ होत राहिली. अगदी दोन महिन्यांपूर्वीपर्यंत एकमेकांवर जहरी टीका केली जात होती. ठाणे महापालिकेच्या सत्तेत अजूनही शिवसेनेनी भाजपला सहभागी करून घेतलेले नाही. बदलापूरमध्ये भाजपचा सहभाग असला तरी दोन्ही पक्षांचे नेते, पदाधिकारी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत तिकिट मिळवून आमदार होण्याचे स्वप्न अनेकांनी पाहिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत या भावी संघर्षाची चुणूक दिसली. कपिल पाटील यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांनी उघडपणे विरोध केला. दस्तुरखुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्यानंतरही शिवसैनिकांचा राग शांत झाला नाही.

- Advertisement -

कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षेला आवर घालण्याची गरज

विधानसभा निवडणुकीत युती होणारच नाही, हे गृहीत धरून अनेकांनी तशी तयारीही सुरू केली आहे. अशा परिस्थितीत लोकसभेप्रमाणे जर युती झाली, तर अनेकांचा भ्रमनिरास होणार आहे. त्यांचे आमदारकी मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहणार आहे. त्यामुळे युतीधर्म कायम राखण्यासाठी दोन्ही पक्षांमधील नेत्यांना आपापल्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षेला आवर घालावी लागणार आहे.

पक्ष नेतृत्त्वाविरूद्ध बंड पुकारणार?

विधानसभा निवडणुकीत युती झाल्यास दोन्ही पक्षांच्या विद्यमान आमदारांचा विजय सोपा होईल. मात्र दोन्ही पक्षांमधून मोठ्या प्रमाणात पक्ष नेतृत्त्वाविरूद्ध बंड पुकारले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात ठाण्यातील युतीच्या एका ज्येष्ठ नेत्याला विचारले असता त्याने जाहीररित्या प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र खाजगीत बोलताना अशी परिस्थिती उद्भवू शकते, हे मान्य केले. मात्र विविध महामंडळांमधील नियुक्त्या, विधान परिषदेच्या जागांचे आश्वासन, स्थानिक स्वराज्य संस्थामधील मोक्याची पदे देऊन ही संभाव्य धुसपूस कमी करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

युती झाली तर…

  • गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभा निवडणुकीत भाजपच्या संजय केळकर यांनी शिवसेनेच्या रविंद्र फाटक यांचा पराभव केला होता. ठाणे बालेकिल्ला असल्याने येथील हार शिवसैनिकांच्या जिव्हारी लागली. आता युती कायम राहिल्यास ठाण्याच्या जागेवरील हक्क सेनेला सोडावा लागेल.
  • अंबरनाथमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर फार थोड्या मताधिक्याने निवडून आले. भाजप उमेदवाराला निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदनिशी लढण्याचा निर्धार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. युती झाल्यास त्यांच्या उत्साहावर पाणी फिरू फिरेल.
  • मुरबाड मतदार संघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आमदार होण्याची इच्छा बाळगून आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले. विद्यमान आमदार किसन कथोरे यांनी त्यांचा पराभव केला. आता तर म्हात्रे यांच्यासह बदलापूर आणि मुरबाडमधून अन्य काहीजण आमदारकीची स्वप्ने बाळगून आहेत. युती झाल्यास त्यांचे मार्ग रोखले जाणार आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -