आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी दिल्ली पोलीस अॅक्शन मोडमध्ये; असदुद्दीन ओवैसी आणि स्वामी नरसिंहानंद यांच्यावर गुन्हा दाखल

नुपूर शर्मांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही अनेकांनी चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. ज्यावर आता दिल्ली पोलिसांकडून कारवाई केली जात आहे

AIMIM Asaduddin Owaisi swami yati narasimhananda named in fir registered by ifso unit of delhi police

भडकाऊ वक्तव्ये आणि सोशल मीडियावर समाजात द्वेषयुक्त मेसेज पसरवल्याप्रकरणी दिल्ली पोलीस आता अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. दिल्ली पोलिसांकडून याप्रकरणी आता कारवाई केली जात आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने आता असदुद्दीन ओवैसी (AIMIM chief Asaduddin Owaisi) आणि स्वामी यती नरसिंहानंद (Swami Yati Narasimhananda) यांच्याविरोधात प्रक्षोभक भाषणं (Hate Speach) दिल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यासह आत्तापर्यंत 9 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांच्या सुत्रांच्या माहितीनुसार, द्वेषपूर्ण वक्तव्ये करत वातावरण बिघडवल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांची कडक कारवाई सुरु आहे. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यासह नऊ जणांवर कठोर कारवाई केल्यानंतर आता एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी आणि स्वामी नरलसिंहानंद यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात द्वेषपूर्ण मेसेज पसरवणे, खोटी आणि पुष्टी नसलेल्या बातम्या पसरवणे, धार्मिक सलोख बिघडवणे आणि इतर अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, नुपूर शर्मा, नवीन कुमार जिंदाल, शादाब चौहान, सबा नक्वी, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुल रहमान, गुलजार अन्सारी, अनिल कुमार मीना आणि पूजा शकुन यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. IFSC पोलिस उपायुक्त केपीएस मल्होत्रा ​यांनी सांगितले की, विविध धर्माच्या लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

नेमका वाद काय?

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी अलीकडेच ज्ञानवापी मशिद परिसरात सापडलेल्या कथित शिवलिंगाबाबत आयोजित एका टेलिव्हिजन शोदरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होत. नुपूर शर्मांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही अनेकांनी चिथावणीखोर वक्तव्ये केली होती. ज्यावर आता दिल्ली पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान नुपूर शर्मा यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षातून काढून टाकण्यात आले आहे, तर भाजपचे मीडिया प्रभारी नवीन कुमार जिंदाल यांचीही वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी निलंबनाची कारवाई केली आहे.

यातच नुपूर शर्मा यांना आता जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. याप्रकरणी त्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करत आता नुपूर शर्मा यांनी सुरक्षा पुरवली आहे.