अजय आशरच्या ‘मैत्री’वर काँग्रेसचा आक्षेप; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई :  खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर य़ांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

निती आयोगाच्या (Niti Committee) धर्तीवर महाराष्ट्रात मित्र आयोगाची स्थापना करण्यात आली. शुक्रवारी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर आणि डॉ.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय आशर यांना बांधकाम क्षेत्र, सामाजिक, नागरी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आहे. तर, राजेश क्षीरसागर राज्य नियोजन मंडळाचे सध्या कार्यकारी अध्यक्ष आहेत.

या नियुक्तीवर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. सोशल मिडियावर व्हिडिओ प्रसारीत करुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना आमदार आशिष शेलार यांनी अजय आशर यांच्याविषयी भूमिका मांडली होती. नगर विकास खात्यामध्ये पैसे गोळा करणारी ही व्यक्ती कोण, असा सवाल आमदार आशिष शेलार य़ांनी केला होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्ष नेते होते. फडणवीस यांनीही यावर आक्षेप घेतला होता.

अशा प्रकारे आक्षेप असताना अशा या लुटारु व्यक्तीला मैत्रीसारख्या महत्त्वपूर्ण संस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे देवेंद्र फडणवीस यांना मान्य आहे का?, देवेंद्र फडणवीस यांची याला संमती आहे का?, याचा खुलासा त्यांनी करावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

तसेच अशा लुटारु व्यक्तीला महाराष्ट्राच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशीही मागणी पटोले यांनी केली आहे. त्यांच्या मागणीवर आता शिंदे-फडणवीस सरकार काय उत्तर देणार हे बघावे लागेल. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोपांच्या फैरी रंगल्या आहेत.